PCMC निवडणूक: ‘‘माझं मत स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित’’ : आमदार महेश लांडगे
लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या पवित्र कार्यासाठी मतदान करण्याचे केले आवाहन

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदान प्रक्रिया सकाळपासून शांत आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरु आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी भोसरी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्यात चुरशीची लढत सुरु आहे, ज्यामुळे शहरात राजकीय वातावरण अधिक तापलेले आहे.
मतदानानंतर महेश लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मतदान हे प्रत्येक नागरिकाचे पवित्र कर्तव्य आहे. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. शहराच्या विकासासाठी सक्षम आणि स्थिर नेतृत्व निवडणे अत्यंत गरजेचे आहे.”
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : पहिल्या चार तासांत १६.०३ टक्के मतदान
महेश लांडगे यांनी आपल्या मताचा उल्लेख करताना सांगितले की, “माझं मत स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांसाठी समर्पित आहे. लोकशाहीच्या महोत्सवात प्रत्येक नागरिकाने सहभागी होणे आवश्यक आहे.”
शहरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची चांगली गर्दी पाहायला मिळत असून, प्रशासनाकडून सुरक्षेसह आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महेश लांडगे यांनी सर्व पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन केले की, “बाहेर पडा, मोठ्या संख्येने मतदान करा आणि आपल्या शहराच्या उज्वल भविष्यासाठी मतदान करा.”
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील एकूण मतदार संख्या १७ लाख १३ हजार ८९१ इतकी असून त्यामध्ये ९ लाख ५ हजार ७२८ पुरुष, ८ लाख ७ हजार ९६६ महिला आणि १९७ इतर मतदारांचा समावेश आहे.
दरम्यान, शहरातील अनेक मतदान केंद्रांवर काही काळासाठी मतदान यंत्रे (ईव्हीएम) बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे काही ठिकाणी मतदारांना प्रतीक्षा करावी लागली. मात्र, निवडणूक प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवण्याचे प्रयत्न केले.





