Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी महापालिका कटिबद्ध’; तृप्ती सांडभोर

पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा.

कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी ई वाहनाचे वितरण.

पिंपरी चिंचवड : दिव्यांग नागरिकांना सबलीकरण, स्वावलंबन आणि सन्मानाची वागणूक देण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिका करत आहे. समाज विकास विभागाच्या वतीने दिव्यांग कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचे काम सुरू आहे. कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, शिक्षण-सुविधा आणि पथदर्शी कल्पनांमुळे दिव्यांग बांधवांचा आत्मविश्वास अधिक दृढ होत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाज विकास विभागाच्या वतीने दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दिव्यांग बांधवांसाठी आयोजित कार्यक्रमात नवीन योजनांचे उद्घाटन व विविध उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक संस्था तसेच विशेष प्राविण्य प्राप्त दिव्यांग नागरिक व विद्यार्थी यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख (माजी आयएएस), यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, यांच्यासह महापालिकेच्या उपायुक्त ममता शिंदे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, दत्तात्रय भोसले, सोनाली नवांगुळ,डॉ. विना तारकुंडे, संगीता जोशी उपस्थित होते.

हेही वाचा –  रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची रेल्वे मार्गाची घोषणा; धार्मिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्र एकत्र येणार

दिव्यांगांच्या क्षमतांचा विकास होण्यासाठी प्रशासन, संस्था आणि नागरिक यांचे एकत्रित योगदान अत्यावश्यक आहे. आपल्या पदाच्या माध्यमातून सर्व दिव्यांग नागरिकांना समावेशक आणि न्याय देण्याच्या आपल्या बांधिलकीची नव्याने जाणीव करून देण्याची संधी मिळते, याचा मला आनंद होत आहे तसेच दिव्यांग कलाकारांनी आज रंगमंचावर सादर केलेली कला ही केवळ त्यांच्या मेहनतीचे नव्हे तर त्यांच्या संवेदनशीलतेचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा प्रतिभेला प्रोत्साहन द्यावे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.महापालिका दिव्यांग बांधवांसाठी सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी कटीबध्द आहे असे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले.

ओमप्रकाश देशमुख यांनी दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या गतवर्षीतील महत्त्वपूर्ण उपक्रमांचा आढावा सादर केला. ते म्हणाले, दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी कौशल्यविकास प्रशिक्षण, रोजगार मार्गदर्शन आणि स्वावलंबन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य तपासणी, कृत्रिम अवयव वाटप व फिजिओथेरपी शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळाला तसेच यू.डी.आय.डी. नोंदणी, आधार-रेशन कार्ड दुरुस्ती तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विशेष केंद्रे उभारण्यात आली. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य व करिअर काउन्सेलिंग सत्रांचे आयोजनही करण्यात आले. समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यानांद्वारे जनजागृती उपक्रम राबविण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर निवेदिता घार्गे यांनी आभार व्यक्त केले.

रंगमंचावर थिरकला दिव्यांगांचा उत्साह

आत्मविश्वासाने रंगमंच उजळवणारे दिव्यांग कलाकार… मंचावर थिरकणारी त्यांची निखळ कला… आणि त्यांना मिळणारी टाळ्यांची दाद… अशा उत्साहपूर्ण वातावरणात चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह सुरांच्या संगतीत आणि भावनांच्या उत्स्फूर्त आविष्कारात न्हाऊन निघाले. महापालिकेने आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. या कार्यक्रमात दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button