Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वच्छ प्रशासनासाठी महापौर रवी लांडगे ‘ॲक्शन मोड’वर!

एकाच विभागात ‘ठाण मांडून’ बसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्यांचे आदेश

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनात पारदर्शकता, गतिमानता आणि शिस्त आणण्यासाठी नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांनी ठोस पावले उचलली आहेत. महापालिकेच्या विविध विभागांत दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे आदेश महापौरांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.

महापौर रवी लांडगे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, महापालिकेच्या आस्थापनेवरील अनेक अधिकारी आणि कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात किंवा एकाच पदावर कार्यरत आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर हितसंबंध तयार होऊन प्रशासकीय कामकाजात ‘अर्थपूर्ण वाटाघाटी’ आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. ही बाब महापालिकेच्या प्रतिमेसाठी अत्यंत घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा     :          ‘पीएमआरडीए’चा अनधिकृत बांधकामांना दणका 

स्थापत्य, पर्यावरण, नगररचना, बांधकाम परवाना, आरोग्य, वैद्यकीय, करसंकलन, भांडार आणि उद्यान यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लेखापाल, भांडारपाल तसेच इतर अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या दीर्घकाळ झालेल्या नाहीत. काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळूनही नियमानुसार दुसऱ्या विभागात बदली न होता, विभागप्रमुखांच्या मर्जीने तेच जुन्या विभागात कायम ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोपही महापौरांनी केला आहे. विभागप्रमुखांकडून आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना सोडण्यास होणारा विरोध आणि प्रशासनाकडून या विषयाकडे झालेले दुर्लक्ष याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. नागरिकांची कामे रखडत असून पारदर्शकतेला हरताळ फासला जात असल्याचे महापौर लांडगे यांनी ठणकावून सांगितले.

यामुळे एकाच विभागात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने इतरत्र बदली करून प्रशासनात व्यापक फेरबदल करण्याचे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले आहेत. या विषयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ कार्यवाही करावी व केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल महापौर कार्यालयास सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी आयुक्तांना दिल्या आहेत. महापौर रवी लांडगे यांच्या या निर्णायक भूमिकेमुळे महापालिकेतील ‘कम्फर्ट झोन’मध्ये असलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनात शिस्त आणि पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

महापालिका ही नागरिकांची सेवा करणारी संस्था आहे; अधिकारी आणि कर्मचारी कुठे किती काळ कार्यरत आहेत यावर निर्भर न राहता, प्रत्येक विभागात पारदर्शकता आणि गतिमानता असावी. आमचा उद्देश प्रत्येक नागरिकाची कामे वेळेत पारदर्शकपणे पूर्ण व्हावीत, यासाठी आम्ही कठोर पण न्याय्य पावले उचलत आहोत.

– रवी लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button