भोसरीत चाकूहल्ला; तरुण गंभीर जखमी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हेवृत्त : सुपरवायझरकडे तक्रारीच्या वादातून जीवघेणा हल्ला

पिंपरी-चिंचवड: चक्रपाणी वसाहतीतील पोते हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर दोन गटांतील वादातून चाकूहल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेत अजीत कोरे (वय अंदाजे २२) हा तरुण गंभीर जखमी झाला असून भोसरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.४० ते दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.४० या दरम्यान घडली. याप्रकरणी नारायण विठ्ठल लखने (वय २२, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. देवकर वस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नारायण लखने व त्यांचा मित्र नवनाथ खामकर हे घरी जात असताना आरोपी रवि तेलंगे व यज्ञेश्वर तेलंगे यांनी त्यांना अडवून “आमच्याबद्दल सुपरवायझरला खोटी माहिती का दिली” असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाला.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध!
दरम्यान, फिर्यादीचा मित्र अजीत कोरे याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी यज्ञेश्वर तेलंगे याने “तू आमच्यात का पडतोस, तुला मारून टाकतो” अशी धमकी देत हातातील चाकू अजीत कोरे याच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात अजीत कोरे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून पोलीस उपनिरीक्षक खाडे अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




