SPARC 2026 मध्ये एम एस एस हायस्कूल श्रीधर नगर चिंचवड इयत्ता आठवी तुकडी ब मधील शार्दुल देशिंगेची राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यशस्वी कामगिरी .

चिंचवड : Sustainable Project And Research Challenge (SPARC) 2026 या राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान प्रकल्प स्पर्धेत MSS (व्ही. के. माटे) हायस्कूल, चिंचवड येथील विद्यार्थी शार्दुल प्रकाश देशिंगे याने प्रथम क्रमांक पटकावत राष्ट्रीय विजेतेपद मिळवले. शाश्वत विकास (Sustainability) हा या स्पर्धेचा केंद्रबिंदू असून, शार्दुलच्या प्रकल्पाने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

शार्दुलने विकसित केलेले ‘मदर केअर प्रेशर कुकर’ मॉडेल हे स्वयंपाकघरातील सुरक्षितता, वाफेच्या अपघातांपासून संरक्षण, ऊर्जा बचत तसेच अन्नातील पोषक मूल्यांचे जतन या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून तयार करण्यात आले आहे. प्रयोगशीलता आणि समाजोपयोगिता यामुळे या प्रकल्पाला परीक्षकांकडून विशेष प्रशंसा मिळाली.या प्रेशर कुकरच्या बाह्य पृष्ठभागावर अॅल्युमिनियम ऑक्साईडचे टिकाऊ कोटिंग देण्यात आले असून त्यामुळे गंज रोखला जातो व उष्णतेचे समसमान वितरण साधले जाते. तसेच सिरेमिक फायबर ब्लँकेट थरामुळे उष्णता अधिक काळ टिकून राहून ऊर्जा बचत होते. स्वयंपाक करताना हातावर वाफ येऊ नये यासाठी स्टीम फ्लो डायव्हर्शन डिझाइन, तर स्वयंपाकघर स्वच्छ राहावे यासाठी वाफ बाहेर जाण्यापासून रोखून तिचा कार्यक्षम पुनर्वापर करण्याची प्रणाली या कुकरमध्ये विकसित करण्यात आली आहे.
हेही वाचा –‘लाडक्या बहिणी’ला लखपती केल्याशिवाय थांबणार नाही, 2100 रुपये देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

उल्लेखनीय बाब म्हणजे,या प्रकल्पाची राज्यस्तरीय INSPIRE पुरस्कार स्पर्धेसाठी निवड झाली आहे.GMRT (Giant Metrewave Radio Telescope) च्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय शालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेतही शार्दुलने प्रथम क्रमांक मिळवला आहे.डी. वाय. पाटील कॉलेज (DYP DPU) येथील आंतरशालेय प्रकल्प स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक पटकावला.एस. बी. पाटील कॉलेज येथे झालेल्या Brain Waves आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.तसेच STEM Lab, पुणे आयोजित विज्ञान प्रकल्प स्पर्धेतही त्याने प्रथम पारितोषिक पटकावले आहे.

या यशस्वी प्रकल्पासाठी शार्दुलला मुख्याध्यापिका सौ. इंद्रायणी माटे पिसोळकर तसेच शाळेतील विज्ञान शिक्षिका सौ. मीना सकपाळ ,व इतर विज्ञान शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शार्दुल देशिंगेच्या या सातत्यपूर्ण यशामुळे शाळेचे, पालकांचे आणि संपूर्ण परिसराचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले असून, भविष्यात तो शाश्वत तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. शार्दुलच्या राष्ट्रीय स्तरावरील या वैज्ञानिक कामगिरीमुळे मोरया शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे, आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या .




