Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखली प्रभाग 1 मध्ये आमदार गोपिचंद पडळकरांच्या सभेने ‘‘वारं फिरलं’’

मिशन- PCMC : भारतीय जनता पार्टीच्या पॅनेलची प्रचंड वातावरण निर्मिती

पिंपरी-चिंचवड | भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी पिंपरी- चिंचवडमधील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना थेट इशाराच दिला आहे. काका–पुतण्यावर जोरदार हल्लाबोल करत पडळकरांनी आक्रमक भाषेत टीका केली. “मी दहा वर्षांपासून पवारांच्या नादी लागलो आहे, माझं काहीही करू शकले नाहीत. मग महेश लांडगे यांचं काय करणार?” असा सवाल करत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला. भाजपच्या नादी लागल्यास भर चौकात नंगा करेल, असा इशाराही पडळकरांनी दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला मोठी चालना मिळाली असून, भाजपाचे आक्रमक नेते व आमदार गोपिचंद पडळकर यांच्या जाहीर सभेमुळे संपूर्ण प्रभागात राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या स्पष्ट वक्तृत्वशैलीमुळे आणि ठाम भूमिकेमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

प्रभाग क्रमांक १ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार सुरेश म्हेत्रे, गणेश मळेकर, सोनम मोरे आणि शितल यादव यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी आमदार गोपिचंद पडळकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख धोरणांचा आढावा घेत भाजपाच सर्वसामान्यांच्या विकासाची खरी हमी असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेबाबत बोलताना पडळकर म्हणाले, “ही महापालिका सोन्याच अंडं देणारी कोंबडी आहे. विरोधकांना ही कोंबडी कापायची आहे, म्हणूनच ते वारंवार पिंपरी-चिंचवडमध्ये येत आहेत आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर टीका करत आहेत. महेश लांडगे हे वाघ आहेत. पंजा मारला, तर कार्यक्रम होईल,” असा इशाराही पडळकर यांनी दिला.

पडळकर पुढे म्हणाले, “गेल्या ४० वर्षांत विरोधकांनी जो विकास केला नाही, तो नऊ वर्षांत देवेंद्र फडणवीस आणि महेश लांडगे यांनी केला आहे. त्यामुळे आता विरोधकांनी उगाच वल्गना करू नयेत.” रोहित पवारांवर पुन्हा हल्ला चढवत ते म्हणाले, “महेश लांडगे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत. ते घराणेशाहीतले नाहीत, तर इथल्या मातीतले, जनतेतून घडलेले नेते आहेत.”

हेही वाचा      :        नऊ वर्षांनंतर पुणे महापालिकेत नवे नगरसेवक; प्रशासन सज्ज, अर्थसंकल्प तयारी अंतिम टप्प्यात

अजित पवारांवर गंभीर आरोप करत पडळकर म्हणाले, “अजित पवारांची छाती फाडली तर १०–१५ कारखाने ढापलेले निघतील. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक सातबारे त्यांच्या नावावर निघतील. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येतील. त्यामुळे महेश लांडगे यांच्या नादी लागू नये. महेश लांडगे हे पैलवान आहेत. कुठल्या क्षणी कुठला डाव टाकतील, सांगता येत नाही. ते अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. आम्ही त्यांना नेता केलं असं म्हणतात, मग तुमचा मुलगा नेता का झाला नाही?” असा सवालही पडळकरांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत ते म्हणाले, “एक्सपायरी डेट जवळ आलेल्या राष्ट्रवादीच्या नादी लागू नका. २०२९ पर्यंत पक्ष टिकेल की नाही याची शंका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच अजित पवारांना सन्मानाची खुर्ची मिळाली असून ती नीट सांभाळा, उगाच भाजपच्या नादी लागू नका,” असा टोला पडळकरांनी लगावला.

विकास… नेतृत्व आणि विश्वासाची त्रिसूत्री…

आमदार पडळकर यांनी भाषणात आमदार महेश दादा लांडगे यांच्या माध्यमातून चिखली व परिसरात सुरू असलेल्या विकासकामांचा विशेष उल्लेख केला. डीपी रस्ते, जलशुद्धीकरण प्रकल्प, शैक्षणिक व सांस्कृतिक सुविधा, अंतर्गत रस्त्यांचे जाळे यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलत असल्याचे त्यांनी सांगितले. या विकासकामांना सातत्य देण्यासाठी भाजपाचे सक्षम व विश्वासार्ह प्रतिनिधी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. “प्रभाग क्रमांक १ चा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर भाजपाच्या पॅनेलला विजयी करणे आवश्यक आहे,” असे ठाम मत आमदार गोपिचंद पडळकर यांनी व्यक्त केले. सुरेश तात्या म्हेत्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, अनुभवी नेतृत्व आणि आमदारांशी असलेले समन्वयाचे नाते प्रभागातील प्रश्न सोडविण्यास उपयुक्त ठरेल. या सभेनंतर प्रभागात भाजपाच्या प्रचाराला अधिक वेग आला असून, आमदार गोपिचंद पडळकर यांच्या उपस्थितीमुळे भाजपाच्या पॅनेलने निवडणूक रणधुमाळीत स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. विकास, नेतृत्व आणि विश्वास या त्रिसूत्रीवर भाजपाचा प्रचार अधिक प्रभावी ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button