“रीड टू लीड” मधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन!
शिक्षण विश्व: गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्स पुणे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी चिंचवड: स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्स पुणे यांच्या वतीने “आंत्रप्रेनर्स बुकमार्क – एव्हरी पेज बिल्ड्स अ लीडर” हा प्रेरणादायी कार्यक्रम भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे भव्य उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक आणि अध्यक्ष विनायक भोंगाळे उपस्थित होते, तर माइंडमॅपर्स करिअर काऊन्सेलिंग पुणे संचालक दिनेश ताठे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आणि पालकांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी आणि मान्यवरांनी दीप प्रज्वलित करून ज्ञान, संस्कार आणि नेतृत्वाचा प्रकाश पसरविण्याचा संदेश दिला.
यानंतर व्यवस्थापकीय संचालिका कविता कडू पाटील यांनी स्वागतपर भाषण करून कार्यक्रमाच्या आयोजनाचे महत्त्व सांगितले आणि आलेल्या पालकांचे मनःपूर्वक स्वागत करत आभार मानले. गायत्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी “रीड टू लीड” या विषयावर नृत्य सादरीकरण करून वाचनाचे आणि ज्ञानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
विद्यार्थ्यांनी सामाजिक जीवनातील आर्थिक व्यवहार, बँक कर्ज प्रक्रिया, इम्पोर्ट एक्स्पोर्ट, ट्रेडिंग यांसारख्या विविध व्यावहारिक विषयांवर सादरीकरण केले. “स्वतःची किंमत मार्केटमध्ये कशी वाढवायची” या विषयावर सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपली स्वतंत्र शैली दाखवत प्रेरणादायी प्रस्तुती दिली.
हेही वाचा – सीएसएम ट्रॉफी नॅशनल लेदर बॉल स्पर्धेत गोपाल मुजमुळेची चमकदार कामगिरी!

गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्स अंतर्गत सर्व शाळांमध्ये “रीड टू लीड” उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, वाचनाचे महत्त्व आणि राष्ट्र उभारणीत तरुण पिढीचे योगदान यावर विविध उपक्रम राबवले जातात. हा उपक्रम एक चळवळ म्हणून पुढे चालू राहिला तर येणाऱ्या पिढ्यांना नोकरीवर अवलंबून न राहता नोकरी देणारी पिढी घडविण्याचे कार्य गायत्री स्कूल करत असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली.
चऱ्होली शाखेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले “विश्वास सबसे बड़ा” हे नाटक विशेष लक्षवेधी ठरले. दिनेश ताठे यांनी मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम समजावून सांगत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पालकांचा सत्कार करण्यात आला आणि कार्यक्रमाचा समारोप उत्साहात झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष विनायक भोंगाळे, व्यवस्थापकीय संचालिका कविता कडू पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत, विपणन अधिकारी शैलेंद्र सिंग, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शेकडो पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. पालकांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल गायत्री स्कूलच्या व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमातून मिळाला आर्थिक साक्षरतेचा संदेश
विद्यार्थ्यांनी दिल्ली मार्केटमधील हिरवा बाजार, चप्पलवाली गल्ली आणि पेलीकोटी मार्केट यांसारख्या व्यवसायिक विषयांवरील माहिती दिली. “पैसा का महत्वाचा असतो” या विषयावर नाटक सादर करून विद्यार्थ्यांनी श्रीमंत व्यक्तींच्या उदाहरणांद्वारे आर्थिक साक्षरतेचा संदेश दिला. शिक्षकांनी सादर केलेल्या “कान मुरगळण्यामागचे फायदे” या हलक्याफुलक्या नाटकाने पालकांची मनं जिंकली.




