‘सत्ता द्या, सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी लावतो’; अजित पवार
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत भाजप विरोधात तोफ डागली

पिंपरी : टेंडरमध्ये रिंग, प्रत्येक ठिकाणी दादागिरी, निविदांचा फुगवटा, टेंडरमध्ये खडाखोड जादा दराने प्रत्येक वेळी काम देणे, सल्लागारांची नियुक्ती ,महापालिकेच्या प्रारुप विकास आराखड्यामध्ये घातलेला गोंधळ या सर्वांची माझ्याकडे पुराव्यांशी माहिती आहे. आमच्या हातात सत्ता द्या या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी लावतो असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पिंपरी येथे म्हणाले.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफ डागली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल, शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तुषार कामठे, माजी आमदार विलास लांडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आधी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले पिंपरी चिंचवड मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे अनेक कामांमध्ये वारंवार दरवाढ देत भ्रष्टाचार करण्यात आला आहे. अजित पवार पुढे म्हणाले टेंडर मध्ये रिंग केली जाते दादागिरी करून कामे ठराविक व्यक्तींनाच दिली जातात निवेदन मध्ये प्रचंड फुगवता निर्माण करून टेंडर मध्ये खाडाखोड करून कामे बळकवली जातात.रस्त्यांच्या अलीकडे पलीकडे अशाप्रकारे कामांची वर्गवारी केली जाते आणि आपल्या जवळच्या लोकांना कामी दिली जातात काही लोकांच्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी कशा वाढल्या यांची कुठे इंडस्ट्री आहे असे देखील अजित पवार म्हणाले.
हेही वाचा – शासकीय जनआरोग्य योजनांमधून कोणालाही उपचार नाकारू नये; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
कोरोना काळातील कुत्र्यांच्या नसबंदीचा मुद्दा देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. 7 हजार 145 कुत्र्यांची नसबंदी केली. यामध्ये 71 लाख रुपये अदा करण्यात आले आणि तरीदेखील गेल्या ऑक्टोबर महिन्यापर्यन्त 20 हजार जणांना कुत्रे चावले असल्याची पालिकेची आकडेवारी आहे, मग नसबंदी झालेले कुत्रे गेले कुठे असा सवाल देखील पवार यांनी उपस्थित केला.
पिंपरी चिंचवडमध्ये खोदाई माफिया फोफावला
अजित पवार म्हणाले, अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावण्यात आली आहे. अनेक रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून तिथे उघडपणे हफ्तेखोरी सुरू आहे. गेल्या नऊ वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात असा विकास झाला आहे. टेंडरमध्ये रिंग करून दादागिरीने पैसे लाटले गेले. स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या संपत्ती कशा वाढल्या, पैसा कुठून आला, याची चौकशी झालीच पाहिजे. महापालिकेवर टीका करताना त्यांनी सांगितले की, सत्तेची मस्ती, माज आणि नशा भाजपला आली आहे. कुत्र्यांच्या नसबंदीतही पैसे खाल्ले गेले. महापालिका अक्षरशः भ्रष्टाचाराने पोखरली गेली आणि कर्जबाजारी करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये खोदाई माफिया फोफावला असून जिओ, एअरटेल, व्होडाफोनसारख्या कंपन्या राजरोसपणे रस्ते खोदत आहेत. शहरात दिवसाढवळ्या लुटारूंची टोळी वावरत आहे, असा आरोपही अजित पवारांनी केला.




