पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना थेट नोकरीची मागणी
भाजपा क्रीडा विभागाचे शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांचे क्रीडा समिती सभापतींना निवेदन

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना महापालिकेत थेट नोकरी देण्यात यावी, अशी ठोस मागणी भाजपा क्रीडा शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांनी केली आहे. शहरातील खेळाडू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि मर्यादित साधनसामग्रीत मेहनत घेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
या खेळाडूंनी केवळ पदके जिंकून थांबले नाहीत, तर शहराचा गौरव वाढवला आहे. मात्र, त्यांना योग्य सुविधा, आर्थिक आधार आणि संधी उपलब्ध झाल्यास त्यांची कामगिरी आणखी उंचावू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यासोबतच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना शिष्यवृत्ती योजना लागू करावी, अत्याधुनिक क्रीडा साहित्य उपलब्ध करून द्यावे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक नेमावेत, अशा विविध मागण्या क्रीडा सभापतींकडे निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या.
हेही वाचा – सेवानिवृत्त होत असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे: सह आयुक्त मनोज लोणकर
“खेळाडूंना योग्य मार्गदर्शन आणि उच्च दर्जाच्या सुविधा मिळाल्यास ते देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करू शकतात. आज खेळाडूंना आधार देणे म्हणजे उद्याच्या भारताला बळकट करणे होय,” असेही यावेळी नमूद करण्यात आले.
या प्रसंगी क्रीडा सभापती कैलासभाऊ कुटे, नगरसेवक कुंदनभाऊ गायकवाड, योगेशभाऊ लांडगे, उदयभाऊ गायकवाड, तसेच शामभाऊ जगताप यांची उपस्थिती होती. “खेळाडू घडले तर शहर घडते” या भावनेतून शहरातील प्रत्येक खेळाडूच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पिंपरी-चिंचवडमधील खेळाडूंसाठी ठोस पावले उचलत आहोत. आपल्या शहरातील आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू ही आपली शान आहेत. त्यांना योग्य संधी, सुविधा आणि आर्थिक आधार मिळाला, तर ते देशाचा तिरंगा जागतिक स्तरावर अधिक उंच नेतील. त्यामुळे अशा खेळाडूंना महापालिकेत थेट नियुक्ती देण्यासाठी आम्ही ठाम आणि कटिबद्ध आहोत.”
– अरुण पाडुळे, शहराध्यक्ष, क्रीडा विभाग, भाजपा.





