अजित पवारांच्या आरोपांना नागरिकांनी नाकारले
निवडणूक निकालाद्वारे महापालिकेत आमदार लांडगे यांचे नेतृत्त्व सिद्ध

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यात ‘अरे तुरे’पर्यंत मजल पोहोचली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर आमदार लांडगे यांनी प्रचाराच्या काळात नमते घेतले. मात्र, निवडणूक निकालाद्वारे महापालिकेत आमदार लांडगे यांचे नेतृत्त्व सिद्ध झाले आहे.
या निवडणुकीत आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान दिले. पवारांच्या प्रत्येक आरोपाला सडेतोडपणे उत्तर दिले. सूक्ष्म नियोजन करून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. महापालिकेत भाजपची सत्ता येण्यात आमदार लांडगे यांचे मोठे योगदान असून, त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले. आमदार लांडगे यांच्यावर टीका करताना पवार यांच्या भाषेचा स्तर घसरला. गल्लीतील दादा, नासका आंबा, भंगार चोर, जमीन खरेदी, संपत्तीत वाढ, भ्रष्टाचाराचा राक्षस, फेकून देईन अशी भाषा वापरली. महापालिकेच्या ठेवी मोडल्या, कर्जबाजारी केली. विकास कामात भ्रष्टाचार केल्याचे मुद्दे पवार यांनी भाषणात आक्रमकपणे मांडले. मात्र, या प्रचाराला मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले.
भाजपकडून आमदार लांडगे यांनी अजित पवार यांना तितक्याच आक्रमकपणे एकेरी भाषेत उत्तर दिले. भाजपच्या तीन आमदारांनी अजित पवार यांना उत्तर दिले नाही. आमदार लांडगे यांनी एकट्याने खिंड लढवत हुशारीने स्थानिक विरुद्ध बारामतीचा कारभारी हा मुद्दा प्रचाराच्या अग्रस्थानी आणला. ‘नको बारामती, नको भानामती’, ‘शहराचा कारभारी शहरातीलच’ असे फलक लाऊन नागरिकांचे लक्ष वेधले.
हेही वाचा – वैभवचा वर्ल्ड रेकॉर्ड! किंग कोहलीला मागे टाकत रचला इतिहास; अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये केला पराक्रम
सलग दुसऱ्यावेळी भाजपची एकहाती सत्ता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात एक सभा आणि प्रचारफेरी काढली. त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका करणे टाळले. विकासकामांवर बोलण्यास प्राधान्य दिले. परिणामी, गेल्या निवडणुकीत ७७ जागा असलेल्या भाजपच्या जागेत यंदा सात जागांची वाढ झाली. ८५ जागा निवडून आल्या. भाजपने निर्विवादपणे महापालिकेवर वर्चस्व मिळविले. सलग दुसऱ्यावेळी भाजपची एकहाती सत्ता आली.
राष्ट्रवादीला रोखले !
राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या वेळीच्या तुलनेत एक जागा जास्त निवडून आणली असून ३७ जागा आल्या आहेत. या पक्षाच्या मातब्बर उमेदवारांचा पराभव झाला. सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिका निवडणुकीत अपयश आले.शिवसेना (शिंदे) पक्षाचे सहा, तर अपक्ष एक उमेदवार विजयी झाला आहे.




