Breaking news: मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात सह दुय्यम निबंधक गजाआड
बावधन पोलिसांनी केली अटक; 40 हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा

पिंपरी चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या मुंढवा येथील 40 हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात दस्त नोंदणी करणाऱ्या सह दुय्यम निबंधकाला बावधन पोलिसांनी रविवारी (दि . ७) अटक केली. भोर येथील त्याच्या निवासस्थानावरून त्याला ताब्यात घेण्यात आले.
रवींद्र बाळकृष्ण तारू (वय ५८, रा. भोर) असे अटक केलेल्या दुय्यम निबंधकाचे नाव आहे. याप्रकरणी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 अधिकारी संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली महिला शीतल किशनचंद तेजवाणी, पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया इंटरप्रायजेस एलएलपी कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील आणि दस्त नोंदणी करणारे सह दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू या तिघांविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. २० मे २०२५ रोजी सह दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्र. ४ येथे हा व्यवहार झाला होता. शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांनी परस्पर संगनमत करून मुंढवा येथील या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर भोगवटदाराचे नाव “मुंबई सरकार” असल्याचे माहिती असतानाही व आवश्यक शासन परवानगी न घेता व्यवहार केला.
शासनाच्या नियमांनुसार या जमिनीचा खरेदी-विक्री दस्त करताना ५ कोटी ८९ लाख ३१ हजार रुपये इतके मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते. तरीही आरोपींनी संगनमत करून शासनाला देय असलेले सुमारे ६ कोटी रुपये मुद्रांक शुल्क न भरता फसवणूक केली. या प्रकरणात यापूर्वी शितल तेजवानी हिला पुणे पोलिसांनी अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे. आता सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू याला अटक झाली आहे. त्यामुळे या या गुन्ह्यात आरोपी असलेले दिग्विजय पाटील यांना कधीही अटक होऊ शकते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“बावधन पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात कागदपत्रांची तपासणी केली असता या प्रकारातील दस्त नोंदणी रवींद्र तारू यांच्या अधिकारात झालेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, त्यांना अटक केली आहे. भोर येथील राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच, या प्रकरणातील दुसरी महिला आरोपी शितल तेजवानी ही सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. आम्ही लवकरच त्यांना ताब्यात घेणार आहोत.”
-विशाल गायकवाड ,पोलीस उपायुक्त.





