रिक्षाचालकाची दोन्ही मुले झाली ‘सीए’
शिक्षण विश्व: दोन्हीही मुलांनी जिद्दीच्या जोरावर यश मिळविले

पिंपरी | आर्थिक परिस्थितीवर मात करीत जिद्द आणि चिकाटी मेहनत आणि अभ्यासाची तयारी असेल; तर यश मिळविता येते, हे चिंचवड येथील रिक्षाचालक प्रवीण आणि आई दीपा येळवंडे यांच्या दोन्ही मुलांनी सिद्ध केले आहे. त्यांचा मुलगा किरण याने सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत यश मिळविले. तर, काही दिवसांपूर्वीच किरणचा भाऊ ओंकार यांनीही सीए परीक्षेत यश मिळवत आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया’च्या वतीने सनदी लेखापाल (सीए) परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. दोन्हीही मुलांनी सीए परीक्षेत यश मिळवल्याने या कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, या परीक्षेच्या अभ्यासासाठी या भावंडांनी कोणताही क्लास लावला नव्हता. ओंकार आणि किरण या दोन्हीही भावंडानी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडीवर जोर देत त्यांनी यश संपादन केले.
हेही वाचा : न्यायप्रक्रियेतील पारदर्शकता व निष्पक्षता नवोदित वकिलांसाठी प्रेरणादायी!
चिंचवड येथील रिक्षाचालक प्रवीण येळवंडे आणि कुटुंबीय चिखली येथील घरकुल वसाहत येथे वास्तव्यास आहेत. दोघांचे वडील हे गेली ३५ वर्षे रिक्षा चालवत आहेत. तर आई दीपा या गृहिणी आहेत. दोन्हीही मुले सीए झाल्याचे समजताच दोघांनाही आनंदाश्रू अनावर झाले. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या या दोघा भावंडानी कधीही परिस्थितीला आपले नशीब ठरवू दिले नाही. रात्रंदिवस दीर्घ अभ्यासाने आणि अथक पारिश्रमाने त्यांनी ही प्रतिष्ठित पदवी मिळविली. यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विद्यार्थ्यांनो, परीक्षेला सामोरे जा
विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या युगात मनात परीक्षेची कोणतीही भीती किंवा न्यूनगंड न बाळगता अभ्यास करावा. कोणतेही यश सहज मिळत नाही, हे लक्षात ठेवावे. इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाची तयारी असेल, तर अपयशला घाबरण्याचे काहीच कारण नाही. या जगात अशक्य काहीच नाही,” अशा शब्दांत किरण आणि ओंकार येळवंडे यांनी विद्यार्थ्यांना ‘सीए’ परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे.





