सीए फायनल परीक्षेत अथर्व भागवते याचे पहिल्याच प्रयत्नात यश!
शिक्षण विश्व: कठीण काळातही न डगमगता जिद्दीने उल्लेखनीय कामगिरी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड येथील अथर्व धीरज भागवते याने मे 2025 मध्ये झालेल्या सीए फायनल परीक्षेत दोन्ही ग्रुपमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत मोठे यश संपादन केले आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मानसिक ताकदीच्या जोरावर मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल अथर्वचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सीएच्या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत अथर्वने यश मिळवताना, फेब्रुवारी महिन्यात वडिलांना GBS (Guillain-Barré Syndrome) सारख्या आजाराने ग्रस्त असतानाही, संपूर्ण तणावपूर्ण वातावरणात अभ्यास सुरू ठेवत आपले ध्येय साध्य केले. या कठीण काळात त्याने मानसिक स्थैर्य राखत अभ्यासाची गती न मोडता हा यशस्वी टप्पा पार केला.
हेही वाचा – २० हजार हॉटेलांचे शटर डाऊन होणार; १४ जुलैपासून बंद ठेवण्याचा हॉटेल, रेस्टॉरंटच्या ‘आहार’ संघटनेचा इशारा
यापूर्वीही अथर्वने सीए फाउंडेशन आणि सीए इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांमध्ये पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्याचा विक्रम केला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल पिंपरी-चिंचवड आयसीएआय ब्रँचचे चेअरमन सीए वैभव मोदी, तसेच त्याचे आर्टिकलशिप ऑर्गनायझेशन GT भारतचे पदाधिकारी – सीए शशी तडवळकर, सीए श्रीरूपा सक्सेना, सीए प्राची कदम, सीए मोहित रजलानी आणि सीए तुषार अरोरा – यांनी अथर्वचे अभिनंदन करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शक अन् प्रेरणादायी…
अथर्वचे वडील प्राध्यापक, तर आई गृहिणी असून, त्यांच्या पाठबळामुळेच हे यश शक्य झाले, असे तो नम्रपणे सांगतो. “अभ्यासातील सातत्य, कठीण काळातही न थांबता पुढे जाण्याची जिद्द आणि घरच्यांचे मोलाचे सहकार्य – यामुळेच हे यश मिळवता आले,” असे अथर्वने सांगितले. अथर्व भागवते याचे यश हे प्रेरणादायी ठरते – विशेषतः अशा काळात जेव्हा अनेक विद्यार्थी दबावाखाली गोंधळतात. अथर्वने यशाचे जे उदाहरण घालून दिले आहे, ते निश्चितच अनेक सीए विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान ठरेल.





