राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत अंशुनम निलेश धावडे याचे सुवर्ण यश! आता राष्ट्रीय पातळीवर दाखवणार कर्तृत्व!
मोशी येथील गायत्री इंग्लिश मिडियम स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी

पिंपरी-चिंचवड : मोशी येथील गायत्री इंग्लिश मिडियम स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजचा कु.अंशुमन निलेश धावडे याने नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत आपल्या अप्रतिम कसरती आणि संतुलन कौशल्याच्या बळावर सुवर्णपदक पटकावले आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची निवड आता राष्ट्रीय स्तरावरील मल्लखांब स्पर्धेसाठी झाली आहे.
स्पर्धेदरम्यान अंशुमनने दाखवलेले कौशल्य, शरीरसंतुलन, तसेच त्याची एकाग्रता, सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली. त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्याने हे यश संपादन केले आहे.
हेही वाचा – उल्कांचा वर्षाव होणार, ‘ही’ तारीख लक्षात ठेवा!
शाळेचे अध्यक्ष मा. श्री. विनायक भोंगाळे साहेब यांनी अंशुमनचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, “अंशुमन हा आमच्या शाळेचा अभिमान आहे. त्याने मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर राज्यस्तरावर यश मिळवले असून, आम्हाला विश्वास आहे की तो राष्ट्रीय स्तरावरदेखील आपले कौशल्य दाखवून सुवर्णपदक मिळवेल.”
मुलाच्या यशाबद्दल पालकांचा आनंद…
अंशुमनच्या पालकांनीही आपल्या मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून, “त्याच्या प्रयत्नांना यश मिळावे यासाठी आम्ही नेहमी त्याला प्रोत्साहन दिले,” असे ते म्हणाले. अंशुमनने आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांना, शिक्षकांना आणि प्रशिक्षक श्री. समाधान माने यांना दिले असून, त्याने सांगितले की, “मी राष्ट्रीय पातळीवर आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करीन.” शाळेच्या परिसरात अंशुमनच्या या यशाबद्दल आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.





