लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंत्ती महोत्सव व्यापक स्वरूपात व्हावा; आमदार अमित गोरखे यांची मागणी

पिंपरी | लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव व्यापक स्वरूपात व्हावा, राज्यातील नामवंत विचारवंत, साहित्यिक व कलाकार यांचा समावेश झाला पाहिजे अशी मागणी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना आमदार अमित गोरखे यांनी केली. तसेच, शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवरती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे दरवर्षी १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या दरम्यान प्रबोधन विचार पर्व च्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव साजरा केला जातो. या जयंती उत्सवामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून महाराष्ट्रातील थोर विचारवंत, कलाकार यांच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचारांची आदान प्रदान केली जाते. त्या भव्य दिवशी कार्यक्रमाला महापालिकेकडून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतील अध्यक्ष व समिती सदस्यांना सोबत घेऊन आयुक्तांची या संदर्भात चर्चा केली असता आयुक्तांनी यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
यावेळी अमित गोरखे म्हणाले, पिंपरी चिंचवड मधील नागरिकांसाठी मी सदैव तयार आहे त्याचबरोबर महापालिका असो किंवा राज्य शासन असो यांच्या माध्यमातून मी नक्कीच येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात प्रयत्न करीन.





