“घड्याळ तेच, वेळ नवी!” : प्रभाग ८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भव्य बाईक रॅली
मिशन- PCMC : खंडेवस्ती चौकातून सुरू झालेली रॅली, हजारो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने प्रभागातील उमेदवारांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या अधिकृत उमेदवारांसाठी आज आयोजित करण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रॅलीदरम्यान “घड्याळ तेच, वेळ नवी” आणि “यावेळेस बदल नक्कीच होणार” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. रॅलीची सुरुवात मंगळवार, १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता खंडेवस्ती चौकातून झाली. शेकडो दुचाकींवर स्वार झालेले कार्यकर्ते, हातात पक्षाचे झेंडे, उमेदवारांच्या नावाचा जयघोष करत प्रभागातील प्रमुख गल्ल्यांमधून रॅली निघाली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांनी उमेदवारांचे औक्षण केले, तर तरुणाईचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

हेही वाचा : शिवसेनेचे उमेदवार समीर जावळकर आणि चेतन बेंद्रे यांची तक्षशिला बुद्ध विहाराला सदिच्छा भेट
मतदारांशी संवाद साधताना उमेदवारांनी प्रभागातील प्रलंबित समस्या, तसेच भविष्यातील विकासकामांवर भर दिला. कार्यकर्त्यांनी यावेळी असा विश्वास व्यक्त केला की, “प्रभाग ८ च्या सर्वांगीण विकासासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी यंदा परिवर्तनाची लाट आहे.” रॅलीचा समारोप श्री. संजय वाबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ करण्यात आला.
प्रभाग ८ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार: सीमा रवींद्र सावळे – प्रभाग ८ (अ) अनुसूचीत जाती, राजश्री अरविंद गागरे – प्रभाग ८ (ब) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – महिला, अश्विनी संजय वाबळे – प्रभाग ८ (क) सर्वसाधारण महिला, तुषार भिवाजी सहाणे – प्रभाग ८ (ड) सर्वसाधारण पुरुष असे आहेत.
“प्रत्येक मतदाराचा आवाज महत्त्वाचा आहे. प्रभाग ८ चा सर्वांगीण विकास आणि पारदर्शक कारभार सुनिश्चित करण्यासाठी तुमचा सहभाग आवश्यक आहे. चला एकत्र येऊ, बदल घडवून आणू!”
– तुषार सहाणे, उमेदवार, राष्ट्रवादी. प्रभाग- 8.




