‘झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए’; भोंदूबाबा अशोक खरातची धक्कादायक कबुली

मुंबई | संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत. विशेष तपास पथक (एसआयटी) कडून सुरू असलेल्या चौकशीत प्रारंभी विशेष माहिती देण्यास टाळाटाळ करणारा अशोक खरात आता धडाधड कबुलीजबाब देत असल्याचे समोर आले आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली त्याने दिली असून महिलांना फसवणे किती सहज शक्य आहे, हेच त्याने आपल्या कबुलीतून स्पष्ट केल्याचे तपासातून उघड झाले आहे.
महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी कोणताही दैवी चमत्कार किंवा वशीकरण केले नसल्याचे सांगताना केवळ हातचलाखी आणि भीती दाखवून त्यांचे शोषण केल्याचे खरातने कबूल केल्याची माहिती आहे. यावेळी ‘झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए’ असे वक्तव्यही त्याने केल्याचे पुढे आले आहे.
दरम्यान, महिलांची फसवणूक आणि अत्याचार प्रकरणात अशोक खरातविरुद्ध दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढत असून आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणात सक्रिय झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच खरातच्या मालमत्तेवर कारवाई करण्याबाबत माहिती दिली होती. त्याच्या संपत्तीची तसेच बँक व्यवहारांची सविस्तर माहिती एसआयटीकडे असून आता ईडीकडूनही आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू होणार आहे.
हेही वाचा : अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएचा ‘हातोडा’; होर्डिंगधारकांना महानगर आयुक्तांचा अल्टिमेटम!
तपासादरम्यान नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मालमत्ता तसेच विविध बँकांच्या १३२ खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. जगदंबा पतसंस्थेत ३२ आणि समता पतसंस्थेत १०० अशी एकूण १३२ खाती आढळली असून त्यामध्ये वारसदार म्हणून अशोक खरातचे नाव असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या सर्व व्यवहारांवर तपास यंत्रणांचे बारकाईने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी ईडी चौकशीची घोषणा केल्यानंतर लगेचच खरातविरुद्ध ईडीचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, खरातची मुलगी तृप्ताबाला हिचीही एसआयटीकडून चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिच्या नावावर कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे.





