विश्वविजेत्या लेकींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव! अमोल मुझुमदारांबद्धल केलं मोठं भाकीत

CM Devendra Fadnavis honoured Maharashtra players : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच जेतेपद पटकावले आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी धूळ चारून हा अविस्मरणीय विजय मिळवला. या ऐतिहासिक क्षणानंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यानंतर शुक्रवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय संघात असलेल्या तीन महाराष्ट्रीयन खेळाडूंना वर्षा बंगल्यावर बोलावून त्यांचे कौतुक केले.
विश्वचषक जिंकल्यानंतर सर्वात प्रथम भारतीय महिला खेळाडूंनी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदी यांनी संघासोबत फोटोसेशन केले आणि खेळाडूंशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले. यानंतर, शुक्रवारी, विश्वविजेत्या संघाचा भाग असलेल्या महाराष्ट्रातील तीन खेळाडू असलेल्या स्मृती मानधना, राधा यादव, आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचा मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले. विश्वचषक जिंकल्यानंतर महाराष्ट्र सरकारने या तिन्ही खेळाडूंना प्रत्येकी २.२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, तर संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना २२.५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या सत्कार सोहळ्यात बक्षिसाची ही रक्कम खेळाडूंना देण्यात आली.
हेही वाचा – ‘…म्हणून पार्थ पवारांवर गुन्हा दाखल केला नाही’; बावनकुळेंनी उलगडून सांगितले नियम
देवेंद्र फडणवीस यांनी खेळाडूंचे कौतुक करताना म्हटले की, “आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. महिला संघाने विश्वचषक जिंकला आहे. याआधी, आपण विश्वचषक इतर देशांमध्ये जाताना पाहिलं आहे, पण तुम्ही (महिला संघाने) आता सगळं काही बदलून टाकलं आणि विश्वचषक घरी आणला आहे. तुम्ही इतिहास रचला आहे.”
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात जेमिमाने केलेल्या निर्णायक शतकी खेळीमुळेच संघाला अंतिम सामना खेळायला मिळाला, असे ते म्हणाले. जेमिमा तिच्या फलंदाजीसोबतच मैदानावर आणि मैदानाबाहेरच्या रिल्समुळेही चर्चेत असते. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “कधी कधी तिची फलंदाजी चांगली असते की तिचे रिल्स चांगले असतात, असा प्रश्न आपल्याला पडतो. ती मैदानावर डबल एंटरटेनमेंट करते. मध्ये मध्ये जे गाणं वाजतं, त्यावर ती प्रेक्षकांना खिळवून ठेवायचं काम करते.”
मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या योगदानाबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांचेही कौतुक केले. अमोल मुझुमदार हे भारतीय महिला संघाला चॅम्पियन बनवणारे पहिलेच प्रशिक्षक ठरले आहेत. फडणवीस म्हणाले, “अमोल मुझुमदार यांनी फार मेहनत घेतली आहे. त्यांची स्टोरी व्हायरल झाली. मी आत्ताच भाकीत करतो, तुमच्यावर सिनेमा निघणार आहे.”




