त्यागमूर्ती रमाई आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन जयंती महोत्सवातच होणार..!
आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी व महापौर रवि लांडगे यांच्यासह स्मारक समितीच्या बैठकीत निर्णय; भाजपा नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांचा यशस्वी पाठपुरावा

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या संथगतीमुळे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर स्मारकाच्या उभारणीला दिरंगाई होत असल्याची गंभीर बाब समोर येत असल्याने समाजबांधवांमध्ये नाराजीच सूर होता. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत तीव्र आक्षेप नोंदवला. स्मारकाचे काम सुरू करण्याबाबत तात्काळ कार्यवाही सुरू करण्याची मागणी केली, यावेळी माता रमाई स्मारक समितीचे पदाधिकारी, महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, नगरसेवक राहुल कलाटे आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज महापालिकेत संपन्न झाली यामध्ये त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाचे भूमिपूजन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव काळातच म्हणजे 14 एप्रिल किंवा 15 एप्रिल दरम्यानच करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती भाजपाचे नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडमध्ये माता रमाई आंबेडकर स्मारकाच्या उभारणीसाठी एप्रिल-२०२६ मध्ये भूमिपूजन होईल, अशी घोषणा प्रशासनाने केली होती. त्यावर काय तयारी झाली आहे? याबाबत डॉ. सुहास कांबळे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. पण स्मारकाच्या भूमिपूजनाला प्रशासनाच्या दिरंगाईमुळे उशीर होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी महापौर व आयुक्त यांच्यासमक्ष नाराजी व्यक्त केली यावेळी रमाई स्मारक समितीचे सदस्य संतोष जोगदंड, बाळासाहेब रोकडे, बापूसाहेब गायकवाड, दशरथ ठाणांबीर, प्रमोद शेरे, नारायण म्हस्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये जिम्नॅस्टिक खेळाडूंसाठी अत्याधुनिक हॉल उभारण्याची गरज
त्यानंतर लगेचच आयुक्त सूर्यवंशी व महापौर लांडगे यांनी संयुक्त बैठक घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पुढाकाराने उभारण्यात येणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत आयुक्तांनी संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असून स्मारकाचे भूमिपूजन हे 14 एप्रिल किंवा 15 एप्रिल रोजी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवादरम्यानच करण्यात येईल असे सकारात्मक आश्वासन दिले आहे.


महापालिका प्रशासनाने एप्रिल २०२६ मध्ये स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार महापौरांनी शहरातील नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण होत असल्याने समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
“माता रमाई आंबेडकर स्मारक हे केवळ एक वास्तू नसून समाजासाठी प्रेरणास्थान आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करून काम तातडीने सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहराचे महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व समाजबांधवांच्या वतीने अभिनंदन. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्मारक नियोजित वेळेत पूर्ण करून नागरिकांना समर्पित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, भाजपा.





