विनातिकीट प्रवास… ‘या’ मार्गावर तब्बल ८५५ बस सोडल्या

पुणे : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त (१ जानेवारी) पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) दोन दिवसांसाठी ८५५ बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी २०२६ या दोन दिवसांत लोणीकंद आणि शिक्रापूर विभागातून आंबेडकरी अनुयायांना विनातिकीट प्रवास करता येणार आहे.
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो अनुयायी येत असतात. या अनुयायांना ऐतिहासिक स्तंभापर्यंत जाण्यासाठी सुविधा म्हणून पीएमपी प्रशासनाकडून दरवर्षी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली जाते. पीएमपी प्रशासनाच्या वतीने लोणीकंद विभागातून ३१ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेपासून पहाटे ४ वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबा माळ, चिंचबन, फुलगाव शाळा आणि पेरणे गाव या मार्गावर ७५ बस सोडण्यात येणार आहे. तर याच मार्गावर १ जानेवारी रोजी पहाटे चार वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत पेरणे टोल नाका पर्यंत २५० बसचे नियोजन केले आहे. त्यानुसार या विभागातून एकून ३२५ बस धावणार असल्याचे पीएमपीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – लाडकी बहीण योजना E-Kycसाठी मुदतवाढ मिळणार की नाही? जाणून घ्या सरकारचा विचार काय?
त्याचबरोबर शिक्रापूर विभागातून ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेपासून शिक्रापूर रस्ता, जीत पार्किंग वक्फ बोर्ड, पिंपळे जगताप चाकण रस्ता ते स्तंभापर्यंत १४० बस, वढू पार्किंग इनामदार हॉस्पिटल ते वढू पर्यंत १० बस अशा एकूण १५० बस सोडण्यात येणार आहे. तसेच १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४ ते रात्री १२ पर्यंत ३५० बस आणि वढू पार्किंगहून ३० बस अशा एकूण ३८० मोफत बसचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील प्रमुख स्थानकांवरून नियमित मार्गावरील २७ बसेसंसह अतिरिक्त ७८ बस अशा एकूण १०५ बस कुस्ती मैदान लोणीकंदपर्यंत धावणार आहेत. यामध्ये पुणे स्टेशन मोलेदिना बस स्थानकावरून ५६, मनपा भवनवरून ३८, दापोडी मंत्री निकेतनवरून २, ढोले पाटील रस्त्यावरून २, अप्पर डेपोवरून ४ आणि पिंपरी आंबेडकर चौकातून ३ जादा बसचा समावेश आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
कोरेगाव भीव ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी या मोफत आणि जादा बससेवेचा लाभ घ्यावा. तसेच पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस,वाहतूक विभाग यांनी पार्किंगचे आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले आहे. त्यानुसार अनुयायी आणि नागरिकांनी सहकार्य करावे.
– पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक




