मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; १५ ते २० वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली परिसरात आज सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तब्बल १५ ते २० वाहनांना जोरदार धडक बसली आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील, नवीन बोगदा ते फूडमॉल हॉटेल दरम्यान, मुंबई लेनवर असलेल्या उतारावर घडला.
उतारावर असताना कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला आणि त्याने समोर असलेल्या चारचाकी व मालवाहू वाहनांवर जबर धडक दिली. या भीषण अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही गाड्या तर अक्षरशः चक्काचूर झाल्या असून, दुर्घटनास्थळाचे दृश्य अत्यंत भीषण होते. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहिती मध्ये समोर येत आहे.
हेही वाचा – UPI नियम, LPG गॅस दर..; १ ऑगस्टपासून होणार मोठे बदल
मात्र, अनेक प्रवासी किरकोळ ते मध्यम स्वरूपात जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनास्थळी खोपोली पोलिसांनी तात्काळ धाव घेतली असून, रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत व बचाव कार्य सुरू आहे.
या अपघातामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला असून, वाहनचालकांनी प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





