Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मिशन विधानसभा : इस्लामपूर मतदारसंघात ऊस दर, व बीलाचीच चर्चा!

विरोधक एकवटले : निशिकांत भोसले-पाटील समर्थकांची प्रचारात कमालीची आघाडी

सांगली | इस्लामपूर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील व महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील(दादा) यांच्यात एकास- एक लढत होत आहे.गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच सर्व पारंपरिक विरोधक एकवटले आहेत. त्यामुळे येथे काट्याची लढत होत आहे. या मतदार संघात शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला ऊस दर, ऊस बील बेरोजगारी व विकासाचे मुद्दे महत्वपूर्ण ठरत आहे. अजूनही जयंत पाटील समर्थकांना हा मुद्दा खोदून काढता आलेला नाही. एकास-एक लढत, विरोधकांची एकी, ऊसबिल न मिळाल्याने व इतर कारखान्याच्या तुलनेतील दरातील दरी यावरुन शेतकऱ्यांची असलेली मोठी नाराजी यामुळे जयंत पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे,त्यांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. विरोधकांनी प्रचारात व सोशल मिडीया मध्ये घेतलेली कमालीची आघाडी यामुळे जयंत पाटील व समर्थकांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.

ऊस उत्पादक शेतकरी कमालीचे संतप्त

इस्लामपूर मतदार संघात ऊस दर, ऊस बील हा मुद्दा कमालीचा महत्वपूर्ण ठरत आहे. इतर जिल्ह्यातील कारखान्यांच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यात टनामागे सुमारे ६००-७०० रुपये दर कमी मिळाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. तशी चर्चाही गावागावांत शेतकरी करताना दिसत आहेत. त्याचबरोबर दिवाळीला ऊस बिल न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या नाराजीत अधिकच भर पडली आहे. ऐन दिवाळीत साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याने ऊस पट्ट्यातील शेतकरी कमालीचे संतप्त आहेत. हाच धागा पकडत ऊस दर, ऊस बील हा मुद्दा निशिकांत भोसले-पाटील(दादा) समर्थकांनी उचलून धरला आहे. अजूनही जयंत पाटील समर्थकांना हा मुद्दा खोदून काढता आलेला नाही.

हेही वाचा    –        चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी प्रचारात सहभागी

जयंत पाटील समर्थकांचा अंदाज फोल..

ऊस दर, ऊस बील या बरोबरच आ. जयंत पाटील व महायुतीचे निशिकांत पाटील यांच्यात एकास- एक लढत होत आहे. त्यातच विखुरलेले विरोधक गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच एकवटले आहेत. विरोधक एकवटणार नाहीत असा जयंत पाटील समर्थकांचा अंदाज होता. तो यावेळी फोल ठरला आहे. आ. जयंत पाटील यांच्या ‘फोडा व जोडा’ या रणनीतीला शह देण्याबरोबरच या निवडणूकीत कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्याचा विडाच विरोधकांनी उचलला आहे. विरोधकांनी एकत्र येत मतदार संघात सभांचा धडाकाच लावला आहे. त्यांनी ऊस दर, ऊस बील यावरून जयंत पाटील यांना घेरले आहे.खा. धर्यशील माने, आ. सदाभाऊ खोत, उमेदवार निशिकांत पाटील, भाजपचे राहूल महाडीक, विक्रम पाटील, शिवसेनेचे आनंदराव पवार, गौरव नायकवडी, सागर मलगुंडे,जयवंत पाटील,संजय कोरे,विक्रम पाटील राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे केदार पाटील आदींनी मतदार संघ पिंजून काढला आहे. विरोधकांनी प्रचारात घेतलेली कमालीची आघाडी यामुळे जयंत पाटील समर्थकांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. विकास कामे, गेल्या ३५ वर्षात कोणी काय केलं यापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरील मुद्दे प्रभावी ठरताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला ऊस दर, ऊस बील हा मुद्दा महत्वपूर्ण ठरत आहे. दिवाळीला ऊस बिल न मिळाल्याने शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

लाडकी बहीण योजना ठरणार लाभदायी..

लाडकी बहीण योजनेतून ७५०० हजार रुपये मिळाल्याने लाडक्या बहिणी महायुती सरकारवर खुश असल्याचे चित्र आहे. तसेच नमो सन्मान योजनेचे शेतकऱ्यांना ४ हजार रुपये मिळाले आहेत. भाऊबीज, दिवाळीच्या दरम्यान मिळाल्याने दिवाळी काही अशी गोड झाली. मतदार संघात याचा निशिकांत भोसले- पाटील यांना चांगला फायदा होणार असल्याचे चित्र आहे. विरोधकांच्या प्रचार बैठक, प्रचार सभांमध्ये महिलांची मोठी उपस्थिती दिसत आहे. एकूणच या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे कारण परिवर्तनाच्या दिशेने या मतदार संघाची वाटचाल सुरू असल्याचे सर्वसामान्य व शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button