फलक, साउंड स्ट्रक्चरवरून गोंधळ; कोल्हापूर शहरात दोन गटात मोठा राडा

Kolhapur | कोल्हापूर शहरातील सिद्धार्थनगर कमानीजवळ काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास फलक लावण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना घडली. सर्किट बेंचलगत असलेल्या या भागात झालेल्या या हिंसक संघर्षामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असली, तरी आज शनिवारी सकाळी या भागात तणावपूर्ण शांतता होती.
सिद्धार्थनगर कमानीजवळ एका मंडळाचा वर्धापनदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी फलक लावण्यात आले होते आणि मोठे स्टेज उभारून गाणी लावण्यात आली होती. यामुळे शेजारच्या मंडळाला अडथळा होत असल्याची तक्रार होती. यातूनच शेजारच्या मंडळाचे कार्यकर्ते तेथून जात असताना किरकोळ वाद झाला. हा वाद पाहता पाहता वाढला आणि दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष उफाळला. यावेळी झालेल्या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले, तसेच अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या.
हेही वाचा : मासुळकर कॉलनी सर्वाधिक तर गवळीनगर, चक्रपाणी वसाहत ठरला सर्वात कमी लोकसंख्येचा मतदार संघ
लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळावरील चित्रफिती तपासून कारवाईला सुरुवात केली आहे. काही संशयितांना लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोल्हापूरचे एसपी योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितले की, गैरसमजुतीमुळे दोन गटांमध्ये वाद झाला. दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. लोकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये, सोशल मीडियावर प्रक्षोभक संदेश पसरवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.





