महाड-रायगड राष्ट्रीय महामार्गाचे ‘छत्रपती महामार्ग’ असे नामकरण करा, संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मंत्री नितीन गडकरींची भेट

रायगड : रायगडमध्ये नामांतराचा विषय सध्या चर्चेत आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे रायगडवाडी असे नामकरण करण्याच्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रस्तावाला गावकऱ्यांनी आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आता किल्ले रायगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती महामार्ग नाव द्या, अशी मागणी माजी खासदार आणि रायगड प्राधिकरण विभागाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. आज संभाजीराजे यांनी दिल्ली येथे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन देत ही मागणी केली आहे.
हेही वाचा – ‘राज्यात ३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान पंधरवडा साजरा होणार’; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
206 कोटी खर्च करुन हा महामार्ग उभारण्यात आला आहे. सद्यस्थितीत या महामार्गाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल असा विश्वास देखील संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर व्यक्त केला आहे. सोबतच या महामार्गावर शिवजन्म ते राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास, पथदिवे, विश्रांतीस्थळे, ऐतिहासिक शिल्पं, आणि सांस्कृतिक दर्शन घडवणारे घटक असावेत, अशी संकल्पना सुद्धा त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याजवळ मांडली. या निवेदनाची केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तत्काळ मान्यता दिली असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देखील दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.





