हिंमत असेल तर गुजराती भाषेला अभिजात दर्जा मिळवून दाखवा…, मनसेकडून भाजपवर जोरदार हल्ला

मुंबई : अभिजात भाषा म्हणजे मुळ भाषा असा त्याचा अर्थ होतो. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी ती भाषा समृद्ध असावी लागते, त्या भाषेतील साहित्य समृद्ध असावे लागते, त्या भाषेला इतिहास हवा, या अटी पूर्ण केल्याशिवाय कोणीही कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देऊ शकत नाही. मग नरेंद्र मोदी असो की डोनाल्ड ट्रम्प असो. हिमंत असेल तर गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दाखवा, असे आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपला केले.
मनसे आणि शिवसेना उबाठाकडून मराठी भाषेसाठी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, ही माहिती घराघरात पोहचण्याची रणनीती भाजपने तयार केली आहे. त्या प्रश्नावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, मराठी माणूस दुधखुळा नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भाषेच्या समृद्धीमुळे मिळाला आहे. कारण मराठी भाषेतील साहित्य समृद्ध आहे. भाषेला मोठा इतिहास आहे. त्यामुळे हा दर्जा मिळाले. कोणाला वाटत असेल मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन आपण उपकार केले आहे, तर माझे त्यांना आव्हान आहे, हिंमत असेल तर गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दाखवा, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
संदीप देशपांडे म्हणाले, मराठी भाषेसाठी शिवसेना उबाठा आणि मनसेचा मोर्चा एकत्र ५ तारखेला निघणार आहे. यासाठी राज ठाकरे यांनी काल पुढाकार घेतला आणि संजय राऊत यांना कॉल केला होता. त्यामुळे आता एकत्रित मोर्चा ५ तारखेला निघणार आहे. आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करतो की, या मोर्च्यात मराठी म्हणून सहभागी व्हा. त्यासाठी आम्ही सगळ्या राजकीय पक्षांसोबत बोलणार आहोत. मनसेमधील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बोलणार आहेत. हा मोर्चा काही राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा नाही आहे. हा मोर्चा मराठी माणसाचा आहे.
हेही वाचा – स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरे यांनी जो पुढाकार घेतला आहे, त्यासाठी मराठी माणूस म्हणून मी त्यांचा ऋणी राहील. कारण मराठी म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत. राजकीय दृष्ट्या ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही? यासंदर्भात दोन्ही ठाकरे बंधू बोलतील. मी त्यावर काही बोलणार नाही. मी खूप छोटा पदाधिकारी आहे, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
महाराष्ट्रावर संकट येते, तेव्हा मराठी व्यक्ती एकत्र येतो आणि तो लढा देतो. या इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसणार आहे. यातून राजकारणाला मोठी कालाटणी मिळणार आहे. संयुक्त महाराष्ट्र मोर्चाचा हा २.० हा वर्जन असणार आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते, जे जे कोणी हिंदी सक्तीच समर्थन करत आहेत, ते ते लोक महाराष्ट्रद्रोही आहेत. भाजपमधील जे नेते मराठी भाषा किंवा हिंदी सक्तीचे समर्थन करतील ते महाराष्ट्रद्रोही आहेत, असे संदीप देशपांडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले.