वाहनधारकांची महत्त्वाची बातमी, ‘HSRP’ नंबर प्लेट बसवण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ

HSRP Number Plate | देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे आदेश राज्यसरकार कडून देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट लावण्याचे कामही सुरू आहे. याचदरम्यान, राज्य सरकराने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे वाहन चालकांना काही दिवसांसाठी दिलासा मिळाला आहे.
सर्व वाहन चालकांना ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसवण्यासाठी आता १५ ऑगस्टपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. यापूर्वी ३० जून पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही सलग तिसरी मुदत वाढ आहे. अशातच आता ही शेवटची संधी असू शकते. आणि म्हणूनच वाहन चालकांनी लवकरात लवकर आपल्या नंबर प्लेटचे काम पूर्ण करावे. अन्यथा ‘एचएसआरपी’ नसलेल्या जुन्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊ शकते. २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
हेही वाचा : मोदी सरकारने विकसित भारताचा पाया रचला; रविंद्र चव्हाण
वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि चोरी रोखण्यासाठी ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट डिझाइन केलेली आहे. २०१९ नंतरच्या नव्या वाहनांना डीलरकडूनच ‘एचएसआरपी’ बसवली जात आहे, पण जुन्या वाहनांसाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे. राज्यात सुमारे दोन कोटी जुन्या वाहनांपैकी फक्त २३ लाख वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्यात आलं आहे, तर ४० लाख वाहनधारकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. मात्र तरीही सव्वा कोटी वाहनं अद्याप एचएसआरपीच्या कक्षेबाहेर आहेत. अनेक वाहनचालकांनी कंपन्यांकडून ‘एचएसआरपी’ पाट्या मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी केल्या. या अडचणी लक्षात घेऊन सरकारने मुदतवाढ दिली आहे.