मुंबईत मुसळधार पाऊस; सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी

Mumbai Local Update | मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पूरांमुळे विदर्भातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी देखील (१९ ऑगस्ट) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिला असून या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राथिकरणाने मुंबई व उपनगरांमधील सर्व शासकीय व खासगी शाळांना, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. अतिमुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आजच्या (१९ ऑगस्ट २०२५) सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परिशा २३ ऑगस्ट २०२५ रोजी नियोजित वेळेनुसार होतील.
हेही वाचा : इंद्रायणी व पवना नदी प्रदूषणामुक्तीसाठी पुढाकार!
भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुटी जाहीर करण्यात येत आहे.
तसेच, मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापना यांनी आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना तातडीने द्याव्यात, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिला असून या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राथिकरणाने मुंबई व उपनगरांमधील सर्व शासकीय व खासगी शाळांना, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.




