Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाला वेग…९० टक्के भूसंपादन पूर्ण

मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाला वेग देण्याचे आदेश मंगळवारी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) दिले. त्यानुसार आता एमएसआरडीसीने नागपूर – चंद्रपूर, नागपूर – गोंदीया आणि भंडारा – गडचिरोली या तीन विस्तारीत महामार्गांच्या बांधकामासाठी फेब्रुवारीअखेरपर्यंत निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी नागपूर – गोंदीया आणि भंडारा – गडचिरोली महामार्गाचे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. लवकरच नागपूर – चंद्रपूर महामार्गाचेही भूसंपादन पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या तिन्ही प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रिया राबवून येत्या काही महिन्यांतच बांधकामाला सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.

समृद्धी महामार्गाचा विस्तार नागपूर – चंद्रपूर, नागपूर – गोंदीया आणि भंडारा – गडचिरोली असा करण्याचा निर्णय घेऊन या तिन्ही महामार्गांचे संरेखन अंतिम करण्यात आले. या तिन्ही महामार्गांच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्या. २०२४ मध्ये निविदा खुल्या करण्यात आल्या. या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि निविदेत तीन महामार्गांसाठी जी.आर. इन्फ्रा, गवार कन्स्ट्रक्शन, बीएससीजीएल इन्फ्रास्ट्रक्चर आदी कंपन्यांनी बाजी मारली.

मात्र निविदा २८ ते ४० टक्के अधिक दराने प्राप्त झाल्याने निविदा प्रक्रियाच अडचणीत आली. त्याचवेळी या तिन्ही प्रकल्पांचे भूसंपादन पूर्ण झाले नसल्याने प्रत्यक्षात काम सुरू करण्यास बराच वेळ लागणार होता. काम सुरू होण्यास वेळ लागणार असल्याने प्रकल्प खर्च आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर तिन्ही महामार्गांच्या निविदा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रकल्प लांबणीवर पडले. महत्त्वाचे म्हणजे नागपूर – चंद्रपूर महामार्गात मोठ्या प्रमाणावर वन क्षेत्र बाधित होणार असल्याने सुधारित संरेखन तयार करून वन क्षेत्र वाचविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागपूर – चंद्रपूर महामार्ग लांबणीवर पडला. पण आता मात्र हे तिन्ही महामार्ग मार्गी लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग देण्याचे आदेश मंगळवारी एमएसआरडीसीला दिले. त्यानुसार आता एमएसआरडीसी कामाला लागणार आहे.

हेही वाचा – महाराष्ट्राची तनु भान देशातील ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’ पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित

नागपूर – चंद्रपूर महामार्गाच्या सुधारित संरेखनानुसार प्रस्ताव पर्यावरण परवानगीसाठी केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. तर दुसरीकडे या महामार्गाचे भूसंपादन अद्याप पूर्ण झालेले नाही. पण आता भूसंपादनाच्या कामाला वेग दिला जाणार आहे. नागपूर – गोंदीया आणि भंडारा – गडचिरोली महामार्गाचे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. आता या तिन्ही महामार्गांच्या बांधकामासाठी फेब्रुवारीअखेरीस नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

नागपूर – चंद्रपूर महामार्गाचे भूसंपादन लवकरच पूर्ण केले जाईल. तर या तिन्ही महामार्गांच्या निविदा अंतिम करून याच वर्षात या तिन्ही महामार्गांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर काम सुरू झाल्यानंतर तीन ते साडेतीन वर्षांत महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. विस्तारीत तिन्ही महामार्ग सेवेत दाखल झाल्यास नागपूर – चंद्रपूर, नागपूर – गोंदीया आणि भंडारा – गडचिरोली प्रवास अतिजलद होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button