Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधातील तक्रारींची होणार चौकशी; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: जमीन व्यवहार, नाेंदणी, मुद्रांकशुल्क आदी महसुली कामकाजासाठी सर्वसामान्यांना संबंधित कार्यालयांत जावे लागते. मात्र या कार्यालयांतील काही आडमुठ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून त्यांना योग्य वागणूक मिळत नाही. याविरोधात बऱ्याचदा तक्रारी केल्यानंतरही या कर्मचाऱ्यांकडून दाद दिली जात नाही. याची गंभीर दखल महसूल विभागाकडून घेण्यात आली असून या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची चौकशी केली जाणार आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

गौण खनिज, जमीन, मुद्रांक, जमीन मोजणी आणि संबंधित महसुली कामकाजाशी संबंधित प्राप्त होणाऱ्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर महसूल विभागाचे हे दक्षता पथक असेल. हे पथक आलेल्या प्रत्येक तक्रारीची ३० दिवसांच्या आत आणि अत्यंत गंभीर तक्रारींची १५ दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी करून अहवाल सक्षम प्राधिकाऱ्यास सादर करेल

दक्षता पथकाने कोणत्याही ठिकाणी कोणतीही तपासणी करताना पथकातील किमान चार अधिकारी उपस्थित असावेत. पथकातील कोणत्याही एका अधिकाऱ्यास स्वतंत्रपणे चौकशी करता येणार नाही, असे यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. महसूल विभागातील कामकाज अधिक पारदर्शक, जबाबदार आणि जनताकेंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम; गिनीज बुकमध्ये नोंद

या दक्षता पथकांच्या कामांचे वेळोवेळी पुनरावलोकन करून आवश्यक त्या सुधारणा सुचविण्यासाठी राज्यस्तरावर महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सदस्य म्हणून महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सहसचिव कार्यासन मुद्रांक १, उपसचिव कार्यासन आस्थापना ६ आणि उपसचिव कार्यासन आस्थापना ४ अ यांचा समावेश आहे. तर उपसचिव कार्यासन आस्थापना ४ हे या समितीचे सदस्य सचिव तथा निमंत्रक असणार आहेत.

या दक्षता पथकामुळे महसूल विभागातील आडमुठ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. पुण्यातील कारेगाव पार्क येथील महारवतन जमिनीच्या खरेदी व्यवहारावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत आल्यानंतर महसूल विभागातील व्यवहारांवर अधिक बारकाईने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जमीन व्यवहारात महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सवलतींच्या व्यवहारांचा दरमहिन्याला आढावा खेतला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही आता दक्षता पथकामार्फत नजर ठेवली जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button