Pune | इन्स्टाग्रामवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ कमेंट केल्याप्रकरणी १९ वर्षीय विद्यार्थिनीला अटक

पुणे | पुणे शहर पोलिसांनी इन्स्टाग्रामवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी १९ वर्षीय विद्यार्थिनीला अटक केली आहे. शुक्रवारी (९ मे २०२५) कोंढवा पोलीस ठाण्यात हवालदार सुभाष जरांडे यांनी याबाबत एफआयआर दाखल केली. पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी अटकेच्या वृत्ताला दुजोरा देत पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.
कोंढवा परिसरातील कौसरबाग येथे राहणारी ही विद्यार्थिनी पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ (देशद्रोह), १९६ (राष्ट्रीय एकतेचा अपमान), १९७ (सार्वजनिक शांततेचा भंग), २९९ (धार्मिक भावना दुखावणे), ३५२ (गुन्हेगारी कृत्य) आणि ३५३ (सार्वजनिक शांतता धोक्यात आणणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : ‘देश-धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले’; नितीन बानगुडे पाटील
एफआयआरनुसार, भारतीय लष्कराने पाकिस्तानविरुद्ध सशस्त्र कारवाई सुरू केल्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवले होते. यावेळी सदर विद्यार्थिनीची आक्षेपार्ह कमेंट पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिला अटक केली.
या घटनेनंतर सकल हिंदू समाजाकडून आंदोलन सुरू असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिसांनी तपास तीव्र केला असून, प्रकरणाची संपूर्ण चौकशी सुरू आहे.