राज्यात ३४३ नागरिकांमागे १ डॉक्टर !

मुंबई: राज्यात ॲलोपॅथी व आयुष असे ४ लाख १८ हजार नोंदणीकृत डॉक्टर असून सध्या ३४३ नागरिकांमागे १ डॉक्टर उपलब्ध असल्याचे राज्याच्या अर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्यात डिसेंबर अखेर २ लाख १३ हजार ५५१ ॲलोपॅथिक डॉक्टरांची नोंदणी झाली असून १ लाख ०५ हजार ९६६ आयुर्वेदिक डॉक्टर, ९ हजार ४६२ युनानी डॉक्टर तर ९० हजार सहा होमिओपॅथी डॉक्टर नोंदणीकृत आहेत.
शासनाने आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिध्द आणि होमिओपॅथी (आयुष) उपचार पद्धतीचा समावेश मुख्य आरोग्यसेवा यंत्रणेत केला आहे. माहे डिसेंबर २०२५ अखेर १,०५,९६६ आयुर्वेदिक डॉक्टर (१०,०२५ पदव्युत्तरसह) आणि ९, ४६२ युनानी डॉक्टर (२१८ पदव्युत्तरसह) महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांचेकडे नोंदणीकृत आहेत तर ९०,००६ होमिओपॅथी डॉक्टर (३,७६१ पदव्युत्तरसह) महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीकडे नोंदणीकृत आहेत.
हेही वाचा – दुबई-मुंबई प्रवासासाठी सोन्याचा भाव! १८ हजारांचे तिकीट ८० हजारांवर; युद्धाच्या छायेत भारतीयांची लूट?
एकूण नोंदणीकृत ॲलोपॅथिक डॉक्टर पैकी ८० टक्के उपलब्धता गृहीत धरून व एकूण आयुष डॉक्टर (२,०५, ८३४) यांची उपलब्धता विचारात घेता राज्यातील डॉक्टर लोकसंख्या प्रमाण १:३४३ एवढे असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. राज्यात सरकारकडून रुग्णांवरील उपचारासाठी १० हजार ७८८ उपकेेंद्रे, १ हजार ९५३ प्राथमिक आरोग्य व ३५४ सामूहिक आरोग्य केंद्रे उपलब्ध आहेत.
आर्थिक वर्षाच्या ९ महिन्यांत २२ लाख बालकांचे पोलिओ लसीकरण झाले असून २०२३-२४च्या तुलनेत हे प्रमाण घटले आहे. २०२३-२४मध्ये १ कोटी ११ लाख ५२ हजार मुलांचे पोलिओ लसिकरण झाले होते. २०२४-२५ वर्षात १६ लाख ९० हजार बालकांचे लसीकरण झाले होते.





