ट्रम्प यांचा १५ कलमी ‘शांती प्रस्ताव’; इराणच्या ७ अटींमुळे चर्चांना नवे वळण

USA Iran Peace Proposals | अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने १५ कलमी शांती प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असून, या प्रक्रियेत पाकिस्तानने मध्यस्थी करण्याची सकारात्मक भूमिका घेतल्याचे वृत्त आहे.
आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या माहितीनुसार, अमेरिकेने संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तानमार्फत इराणसमोर काही महत्त्वाचे मुद्दे ठेवले आहेत. यामध्ये इराणने युरेनियम संवर्धन थांबवणे, अण्वस्त्र निर्मितीचे प्रयत्न बंद करणे आणि जगासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी जहाजांसाठी खुली ठेवणे, अशा अटींचा समावेश आहे.
याशिवाय, इराणने बंडखोर गटांना दिले जाणारे निधी आणि शस्त्रसामग्री पुरवठा थांबवावा, तसेच नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो येथील अणुसुविधा बंद कराव्यात, अशी मागणी अमेरिकेने केली आहे. त्याचबरोबर इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर मर्यादा आणण्याचाही मुद्दा प्रस्तावात मांडण्यात आला आहे. या अटींच्या बदल्यात, अमेरिकेने तेहरानवरील आर्थिक निर्बंध हटवण्याची तयारी दर्शवली असून, बुशेहर येथे नागरी अणुऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी मदत करण्याचाही प्रस्ताव दिल्याचे समजते.
हेही वाचा : कोलंबिया हादरला! हवाई दलाचे C-130 विमान कोसळले, ६६ ठार
इराणकडून युद्ध समाप्तीसाठी सात अटी
दरम्यान, अमेरिकेच्या प्रस्तावानंतर इराणने देखील संघर्ष थांबवण्यासाठी सात अटी मांडल्याची माहिती समोर आली आहे. इराणने आखाती देशांमधील अमेरिकेचे लष्करी तळ बंद करावेत, भविष्यात इराणवर हल्ले होणार नाहीत याची हमी द्यावी, तसेच इस्रायलने हिजबुल्लाहवरील हल्ले थांबवावेत, अशी मागणी केली आहे. याशिवाय, इराणवरील आर्थिक निर्बंध पूर्णपणे हटवावेत, युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर निर्बंध लादू नयेत आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून कर आकारण्यास मुभा द्यावी, अशा अटी इराणने मांडल्याचे वृत्त आहे.
एकूणच, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी अटी-शर्तींसह चर्चा सुरू असल्याने आगामी काळात या चर्चांचा जागतिक राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





