‘युद्ध संपलेले नाही’; युद्धविराम जाहीर करत इराणचा अमेरिकेला कडक इशारा

Iran US ceasefire | अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे. दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर एकमत झाले असून, यानंतर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी आपल्या सर्व लष्करी दलांना गोळीबार थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, इराणने स्पष्टपणे सांगितले आहे की हा युद्धविराम म्हणजे युद्धाचा शेवट नाही.
इराणच्या सरकारी वृत्तवाहिनी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग (IRIB) वर प्रसारित करण्यात आलेल्या निवेदनात खामेनी म्हणाले, “हा युद्धाचे शेवट नाही, पण सर्व लष्करी शाखांनी सर्वोच्च नेत्यांच्या आदेशाचे पालन करावे आणि त्यांच्याकडून होणारा गोळीबार थांबवावा.”
यावेळी इराणने ठामपणे सांगितले की, युद्धविरामाचा अर्थ संघर्ष संपल्याचा होत नाही. जर शत्रूपक्षाने म्हणजेच अमेरिका किंवा इस्रायलने कोणतीही आक्रमक हालचाल केली, तर त्याला तात्काळ आणि पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर दिले जाईल.
हेही वाचा : ‘मध्य पूर्वेतील युद्धाचे अर्थव्यवस्थेवरील होणाऱ्या परिणामाचे अध्ययन करा’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा
युद्धविराम जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने म्हटले आहे की, “याचा अर्थ युद्धाची समाप्ती असा होत नाही. आमचे हात ट्रिगरवरच कायम आहेत आणि शत्रूकडून थोडी जरी चूक झाली, तर त्याला पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर दिले जाईल.”
दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणच्या विरोधात संयुक्त लष्करी मोहिम सुरू केली होती. या संघर्षाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या ३९ दिवसांत विविध देशांमध्ये शेकडो लोकांचा या संघर्षात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेने इराणला युद्ध थांबवण्यासाठी १५ कलमी प्रस्ताव पाठवला होता. त्यावर इराणकडून वाटाघाटींचा आधार म्हणून १० कलमी सुधारित प्रस्ताव परत पाठवण्यात आला आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, एकदा वाटाघाटींमधील तपशील निश्चित झाला की तेव्हाच युद्ध संपल्याचे मान्य केले जाईल.
दरम्यान, या महत्त्वाच्या वाटाघाटी १० एप्रिल (शुक्रवार) रोजी इस्लामाबाद येथे सुरू होणार असून त्या दोन आठवडे चालण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या सहमतीनुसार हा कालावधी वाढवला जाऊ शकतो.





