युद्ध जवळपास संपण्याच्या मार्गावर; डोनाल्ड ट्रम्प यांची आशादायी प्रतिक्रिया

Donald Trump | आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडत असताना इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध कधी थांबणार, याकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दोन्ही देशांनी जाहीर केलेला दोन आठवड्यांचा युद्धविराम येत्या आठवड्यात संपणार असल्याने पुन्हा संघर्ष तीव्र होणार की कायमस्वरूपी तोडगा निघणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपण्याबाबत आशादायी संकेत दिले आहेत. फॉक्स बिझनेस नेटवर्कवरील “मॉर्निंग्स विथ मारिया” या कार्यक्रमात बोलताना त्यांनी, “मला वाटते की हे युद्ध संपण्याच्या मार्गावर आहे. माझ्या मते ते संपण्याच्या अगदी जवळ आले आहे,” असे सांगितले.
हेही वाचा : श्रीवर्धन समुद्रकिनारा ब्लू फ्लॅग बीच म्हणून विकसित होणार; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
ट्रम्प पुढे म्हणाले की, “जर मी आत्ता कारवाई थांबवली, तरी त्या देशाला पुन्हा उभे राहण्यासाठी २० वर्षे लागू शकतात. अजून आमचे काम पूर्ण झालेले नाही. मात्र, त्यांना आता तडजोड किंवा करार करण्याची तीव्र इच्छा आहे.”
युद्ध सुरू झाल्यापासून ट्रम्प यांनी अनेकदा अमेरिकेच्या विजयाचा दावा केला असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती अधिक गुंतागुंतीची असल्याचे दिसून आले आहे. १० एप्रिल रोजी इस्लामाबाद येथे झालेली शांतता बैठकही कोणताही ठोस निर्णय न घेता संपली.
मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार इस्लामाबाद येथे पुन्हा एकदा चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. या चर्चेसाठी अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असल्याने युद्धविरामानंतर कायमस्वरूपी युद्धबंदीची घोषणा होईल का, याकडे जागतिक नेत्यांचे आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.





