Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

मध्य प्रदेशात राजधानी एक्सप्रेसला भीषण आग; एसी डबा जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Rajdhani Express fire accident | मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात आज (रविवार) पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. थिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या एका एसी डब्याला (AC Coach) भीषण आग लागली. पश्चिम मध्य रेल्वे (WCR) झोनच्या कोटा विभागातील लुनी रिच्छा (LNR) आणि विक्रमगढ अलोट (VMA) स्थानकांदरम्यान धावत असताना ही घटना घडली. सुदैवाने, रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हर्षित श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १२४३१ राजधानी एक्सप्रेसच्या ‘बी-१’ (B-1) डब्याला पहाटे ५.१५ वाजता आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने पावले उचलली. प्रभावित झालेल्या डब्यातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. या अपघातात कोणत्याही प्रवाशाला किंवा रेल्वे कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही.

हेही वाचा

पुणे जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेला आजपासून सुरुवात

रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य

घटनेनंतर तात्काळ ओव्हरहेड वायरचा (OHE) वीज पुरवठा खंडित करण्यात आला आणि आग लागलेला ‘बी-१’ डबा ट्रेनपासून वेगळा करण्यात आला. रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. बाधित डब्यातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना घटनास्थळीच अल्पोपहार (Refreshments) देण्यात आला. तसेच, प्रवाशांचा पुढील प्रवास सुकर व्हावा यासाठी कोटा स्थानकावर ट्रेनला एक अतिरिक्त डबा जोडला जाणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.

रेल्वे वाहतूक विस्कळीत, चौकशी सुरू

या घटनेची माहिती मिळताच कोटा विभागातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, ट्रेन क्रमांक १२९५५ ला महिदपूर रोड (MEP) स्थानकावर थांबवून ठेवावे लागले होते.

सकाळी साधारण ९.४८ वाजता ही राजधानी एक्सप्रेस डिझेल इंजिनच्या सहाय्याने पुढील विक्रमगढ अलोट रेल्वे स्थानकासाठी रवाना करण्यात आली. “हा रेल्वे मार्ग लवकरच पूर्णपणे मोकळा केला जाईल. मात्र, धावत्या ट्रेनच्या एसी डब्याला आग लागण्याचे नेमके कारण काय होते, याचा तपास रेल्वेकडून सुरू आहे,” अशी माहिती हर्षित श्रीवास्तव यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button