गॅस ग्राहकांसाठी मोठा बदल! BPCL चे 10 नवे नियम जाहीर

LPG Cylinder Booking | आता एका गॅस कनेक्शनवर एका महिन्यात जास्तीत जास्त 2 सिलेंडरच बुक करता येतील आणि यापेक्षा जास्त बुकिंग केल्यास सिस्टम विनंती ब्लॉक करू शकते. एका आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या काळात सरकार 12 सिलेंडरवर सबसिडी देते आणि त्याव्यतिरिक्त ग्राहक 3 विना-सबसिडीचे सिलेंडर घेऊ शकतो. म्हणजेच वर्षभरात एका कनेक्शनवर कमाल 15 सिलेंडरची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
यापूर्वी पहिला सिलेंडर घेतल्यावर 21 दिवसांनी दुसरा सिलेंडर बुक करता येत असे, मात्र आता दोन सिलेंडरमध्ये किमान 25 दिवसांचे अंतर असणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुमचा 12 सिलेंडरचा वार्षिक कोटा संपला असेल, तर तुम्हाला हॅलो बीपीसीएल या ॲपचा वापर करून अधिक सिलेंडरची मागणी करावी लागेल. जास्तीचा सिलेंडर मागताना ॲपद्वारे घरातील कार्यक्रम किंवा पाहुण्यांची संख्या विचारली जाईल आणि या उत्तरांच्या आधारेच निर्णय घेतला जाईल.
हेही वाचा : मोशीतील ४७० विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे ‘ज्ञानमंदीर’
डिलिव्हरीच्या वेळी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल आणि हा कोड सांगितल्याशिवाय तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही. गॅस बुकिंग केवळ नोंदणीकृत मोबाईल नंबरवरूनच करता येईल, त्यामुळे नंबर बदलल्यास तो त्वरित एजन्सीमध्ये किंवा ॲपद्वारे अपडेट करणे आवश्यक आहे. सरकारने सर्व ग्राहकांसाठी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केले असून केवायसी अपडेट नसल्यास बुकिंगमध्ये अडथळे येऊ शकतात.
संशयास्पद किंवा मर्यादेबाहेर बुकिंग आढळल्यास गॅस एजन्सीकडून ग्राहकांना अतिरिक्त कागदपत्रांची किंवा प्रत्यक्ष पडताळणीची मागणी केली जाऊ शकते. हे सर्व कडक नियम प्रामुख्याने घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी आणि युद्धासारख्या परिस्थितीत पुरवठा साखळी विस्कळीत होऊ नये यासाठी लागू करण्यात आले आहेत. या नवीन नियमांमुळे सामान्य ग्राहकांना बुकिंग करताना थोडी काळजी घ्यावी लागणार असली तरी सर्वांच्या सोयीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.





