आजपासून जीएसटी दरात बदल; कोणत्या वस्तू स्वस्त, कोणत्या महाग? जाणून घ्या..

New GST Rates | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्यानुसार, आजपासून वस्तू आणि सेवा कराच्या (GST) दरात मोठे बदल झाले आहेत. या निर्णयामुळे आता 12% आणि 28% चे जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आले असून, केवळ 5% आणि 18% हे दोन स्लॅब शिल्लक राहिले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत तर चैनीच्या आणि आरोग्याला हानिकारक वस्तू महाग झाल्या आहेत.
या बदलांमुळे अनेक महत्त्वाच्या वस्तूंवरील कर कमी झाला आहे. आता काही वस्तूंवर कोणताही कर लागणार नाही, तर काही वस्तूंवर 5% किंवा 18% जीएसटी लागेल.
शून्य टक्के जीएसटी : प्रक्रिया केलेले दूध, पनीर, पिझ्झा ब्रेड, तयार चपात्या, तसेच पेन्सिल, वह्या, आणि 33 जीवनरक्षक औषधे यांसारख्या वस्तूंवर आता कोणताही कर लागणार नाही.
5 टक्के जीएसटी : वनस्पती तेल, तूप, साखर, बिस्किटे, चॉकलेट, पास्ता, ज्यूस, शाम्पू, साबण, टुथपेस्ट, घरातील भांडी आणि कपडे शिवण्याची मशीन यांसारख्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. याशिवाय ट्रॅक्टर आणि शेतीची उपकरणे, थर्मामीटर आणि वैद्यकीय ग्लुकोमीटर यांसारख्या वस्तूंचाही यात समावेश आहे.
हेही वाचा : नव्या जीएसटी सुधारणांतून भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18 टक्के जीएसटी : एसी, वॉशिंग मशीन, टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर, छोट्या कार, तीन चाकी वाहने, 350 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकी आणि रुग्णवाहिका यांसारख्या वस्तूंवरील कर कमी झाल्यामुळे त्या स्वस्त झाल्या आहेत.
या बदलामुळे चैनीच्या आणि आरोग्यास हानिकारक असलेल्या वस्तूंवरील कर वाढवण्यात आला आहे. या वस्तूंवरील जीएसटी 28% वरून थेट 40% इतका करण्यात आला आहे.
वाहने : 350 सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकी, मोठ्या एसयुव्ही गाड्या आणि अलिशान कार आता अधिक महाग झाल्या आहेत.
मनोरंजन आणि व्यसन : कॅसिनो, रेस क्लब आणि सट्टेबाजी यांसारख्या सेवांवर आता जास्त जीएसटी लागेल. तसेच सिगार, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि कार्बनयुक्त पेये देखील महाग झाली आहेत.





