विमान तिकीट महागणार; एअर इंडियाकडून तीन टप्प्यांत भाडेवाढ

Air India Ticket Rate Increased | मध्य पूर्वेतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता विमान प्रवासावरही दिसू लागला आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यानंतर आता विमान प्रवास महाग होणार असून एअर इंडियाने विमान भाड्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनीकडून ही दरवाढ तीन टप्प्यांमध्ये लागू करण्यात येणार आहे.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ च्या सुरुवातीपासून आखाती प्रदेशात इंधनाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे विमान इंधन (एटीएफ) महाग झाले आहे. इंधनाच्या वाढलेल्या किमतीमुळे विमान कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली असून त्याचा परिणाम म्हणून ही दरवाढ लागू करण्यात येत आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात तीन टप्प्यांत नवे दर लागू केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
तीन टप्प्यांत दरवाढ
फेज एक: देशांतर्गत आणि सार्क देशांमध्ये जाणाऱ्या विमान प्रवासासाठी १२ मार्चपासूनच्या बुकिंगवर भाडेवाढ लागू होणार आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या सार्क देशांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना ३९९ रुपये अधिक मोजावे लागतील.
हेही वाचा : ‘दुग्ध संकलन केंद्रांच्या वीजदरात मोठी कपात; शेतकऱ्यांना मोठा दिलासा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फेज दोन: दुसऱ्या टप्प्यात काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी दरवाढ करण्यात येणार आहे. यामध्ये पश्चिम आशिया (१० डॉलर), दक्षिण-पूर्व आशिया (२० डॉलर) आणि आफ्रिका (३० डॉलर) इतकी वाढ केली जाणार आहे. ही वाढ १८ मार्चपासूनच्या बुकिंगवर लागू असेल.
फेज तीन: तिसऱ्या टप्प्यात हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांकडे जाणाऱ्या विमान प्रवासासाठी दरवाढ केली जाणार आहे. या टप्प्याची अंमलबजावणी कधीपासून होणार याबाबतची तारीख पुढे जाहीर केली जाईल, असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, विमान कंपनीच्या एकूण ऑपरेटिंग खर्चात एव्हिएशन टर्बाइन इंधनाचा वाटा सुमारे ४० टक्के असतो. त्यामुळे इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यास विमान भाड्यात बदल करणे अपरिहार्य ठरते. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचा थेट परिणाम या दरवाढीवर झाल्याचे कंपनीने सांगितले आहे.





