अखेर ९ महिन्यांनी ‘सितारे जमीन पर’ ओटीटीवर रिलीज होणार; ‘त्या’ निर्णयावरून आमिर खानचा यु-टर्न?

Sitaare Zameen Par OTT Announcement : आमिर खानच्या काही लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘तारे जमीन पर’. हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता. २००७ मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’चा गेल्यावर्षी ‘सितारे जमीन पर’ हा सीक्वेल आला. आर. एस. प्रसन्न दिग्दर्शित हा चित्रपट जून २०२५ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे.
‘सितारे जमीन पर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख हे यात मुख्य भूमिकांत आहेत. कथेसाठी आणि कलाकारांच्या अभिनयासाठीही चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झालं.
चित्रपटगृहांत बघता न आलेले प्रेक्षक हा सिनेमा ओटीटीवर कधी येतोय, याची वाट बघत होते आणि अखेर त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘सितारे जमीन पर’ अखेर एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आता हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार, याबद्दल जाणून घेऊ…
हेही वाचा – मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता सातही दिवस !
सितारे जमीन पर’ हा SonyLIV वर पाहता येणार आहे. SonyLIV ने दिलेल्या माहितीनुसार, ‘सितारे जमीन पर’ हा SonyLIV वर थेट प्रदर्शित होणारा पहिलाच हिंदी चित्रपट ठरणार आहे. त्यामुळे SonyLIV साठी हा एक चित्रपटाच्या ओटीटी प्रीमियरसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
चित्रपटगृहांत रिलीज झाल्यानंतर महिनाभराने, आमिरने हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याऐवजी वेगळा प्रयोग केला. त्याने हा चित्रपट त्याच्या YouTube वरील ‘Aamir Khan Talkies’ या चॅनेलवर पे-पर-व्यूद्वारे रिलीज केला. यामध्ये प्रेक्षकांना १०० रुपये भरून चित्रपट पाहता आला. त्यावेळी आमिर खानने सिनेमा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि डिजिटल प्रीमियरच्या नव्या पद्धतीचा प्रयोग करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.





