‘बटवारा १९४७’ चा दुसरा टीझर प्रदर्शित, सनी देओल दमदार ॲक्शनमध्ये

Batwara 1947 Teaser 2 Release: आमिर खान यांच्या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार झालेल्या ‘बटवारा १९४७’ या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला आहे. सनी देओल, प्रीती झिंटा आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यात भावनिक प्रसंगांसह दमदार ॲक्शनची झलक पाहायला मिळते.
टीझरची सुरुवात १९४७ च्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या हृदयद्रावक प्रसंगांनी होते. सामान्य नागरिकांवरील मारहाण, जाळपोळ आणि अत्याचार यांचे चित्रण यात करण्यात आले आहे. सुरुवातीच्या दृश्यांमध्ये प्रीती झिंटा, अली फजल आणि शबाना आझमी यांची पात्रे या हिंसाचारामुळे व्यथित झालेली दिसतात.
हेही वाचा – अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट
त्यानंतर सनी देओल यांची दमदार एन्ट्री होते आणि त्यांचा प्रभावी संवाद संपूर्ण टीझरचा सूरच बदलून टाकतो. ते म्हणतात, “माणूस घाबरत आहे, माणूस मरत आहे… पण मला जिवंतपणी मरायचं नाही. मी जिवंत आहे आणि जिवंत असल्याचा पुरावा देईन.” या संवादासोबत सनी देओल जबरदस्त ॲक्शन करताना दिसतात.
हा चित्रपट प्रसिद्ध साहित्यिक असगर वजाहत यांच्या गाजलेल्या ‘जिस लाहौर नई वेख्या, ओ जम्या ए नई’ या नाटकावर आधारित आहे. भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील वेदना, संघर्ष आणि मानवी नात्यांची कहाणी या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. चित्रपटाला ए. आर. रहमान यांनी संगीत दिले असून, गीतकार जावेद अख्तर यांनी गीते लिहिली आहेत.
या चित्रपटात सनी देओल यांनी सिकंदर मिर्झा ही भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत प्रीती झिंटा, शबाना आझमी, अली फजल, अभिमन्यू सिंह आणि करण देओल हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ‘बटवारा १९४७’ हा चित्रपट यावर्षी १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.





