अभिनयासोबतच गायनातही अव्वल आहेत मु्ख्यमंत्री विजय थलपती, 25 हून अधिक गाण्यांना दिला आवाज, शेवटचं गाणं तर…

Thalapathy vijay : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि चाहत्यांचा प्रचंड आवडता असलेला अभिनेता म्हणजे थलपती विजय. थलपती विजय आज त्यांचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास निमित्ताने देशभरातील चाहते, चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विजय यांना प्रामुख्याने त्यांच्या दमदार अभिनयासाठी आणि अप्रतिम नृत्यशैलीसाठी ओळखले जाते. मात्र, ते एक उत्कृष्ट प्लेबॅक गायकही आहेत, हे फार कमी लोकांना माहिती आहे.
अभिनयासोबतच संगीत क्षेत्रातही विजय यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज संगीतकार इलैयाराजा आणि ए. आर. रहमान यांच्यासोबतही गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजातील अनेक गाणी आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
विजय यांनी त्यांच्या गायन कारकिर्दीची सुरुवात 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रसिकन’ या चित्रपटातील ‘Bombay City Sukka Rotti’ या गाण्याद्वारे केली होती. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी रेकॉर्ड केली.
हेही वाचा – “ओसाड गावाची पाटिलकी सोडतो हे म्हणणं कितपत योग्य?”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आतापर्यंत 25 हून अधिक लोकप्रिय गाण्यांना आवाज दिला आहे. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या Sachien या चित्रपटातील ‘Vaadi Vaadi’ हे गाणे त्यांच्या गायन कारकिर्दीतील 25 वे गाणे ठरले.
25 वे गाणे रेकॉर्ड केल्यानंतर विजय यांनी काही काळासाठी गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अभिनयावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी सिंगिंगमधून ब्रेक घेतला. मात्र, चाहत्यांना त्यांचा आवाज पुन्हा ऐकण्याची संधी काही वर्षांनी मिळाली.
2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थूपाकी’ या चित्रपटातील ‘Google Google’ या गाण्याद्वारे विजय यांनी गायन क्षेत्रात दमदार पुनरागमन केले. हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले आणि संगीतप्रेमींनी त्याचे भरभरून कौतुक केले.
या गाण्यासाठी त्यांना ‘विजय अवॉर्ड्स’मध्ये ‘फेव्हरेट साँग ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला. तसेच SIIMA Awards मध्ये ‘बेस्ट प्लेबॅक सिंगर’ या पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले. विजय यांच्या गायन कौशल्याची दखल प्रतिष्ठित Filmfare Awards South मध्येही घेण्यात आली. त्यांना दोन वेळा सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायकासाठी नामांकन मिळाले.





