breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#Covid-19: ‘करोना’ नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंधांचा विचार करावा लागेल- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे |

पुणे शहर आणि जिल्ह्याबरोबरच बारामती तालुक्यातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी मतदारसंघातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. करोनाचा प्रसार वाढत आहे. पुढील काही दिवसांत करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंधांचा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आढावा बैठकीत दिला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक पार पडली. “सद्यस्थितीत बारामती तालुक्यात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल. ज्या ठिकाणी करोनाचे रुग्ण जास्त आहेत, त्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करा. ते करताना नगरसेवकांना विश्वासात घ्या. ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यावर भर द्या, पुणे जिल्हा परिषदेनं ज्याप्रकारे करोना अपडेटसाठी तयार केले आहे त्याच धर्तीवर बारामती तालुक्यासाठीही ॲप तयार करावे. जेणेकरून करोनाची सद्यस्थिती आणि बेडची उपलब्धता याबाबत नागरिकांना माहिती मिळणं सुलभ होईल. अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करावं. नागरिकांपर्यंत पोहोचून करोनाबाबत जनजागृती करावी.

ऑक्सिजन बेडची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. बारामती शहरात काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. यावर प्रशासनाने कडक उपाययोजना करुन दंडात्मक कारवाई करावी,” अशा सूचना अजित पवार यांनी बैठकीत दिल्या. “सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणं आवश्यक आहे. लग्नसमारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी नियमानुसार लोकांची संख्या मर्यादित ठेवणं अपेक्षित आहे. याकडे विशेष लक्ष द्यावं तसंच लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा वापर करावा, कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्रीची चांगल्या प्रतीची खरेदी करावी. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, याचीही प्रशासनाने खबरदारी घ्यावी. ‘करोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्यानं काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक अंतर ठेवणं, हात वारंवार धुणं, गर्दी टाळणं या त्रिसुत्रीवर भर देत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती व करोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सिल्वर ज्युबिलीचे डॉ. सदानंद काळे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, यांनीही करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

वाचा- देश हादरला! १४ बेपत्ता जवानांचे सापडले मृतदेह; नक्षल्यांच्या घातक हल्ल्यात २२ जवान शहीद

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button