पारंपरिक गुंतवणूक मागे; आता ‘SIF’ मालमत्तेत २९ टक्क्यांची ऐतिहासिक झेप!

मुंबई : भारतीय गुंतवणूकदारांमध्ये पारंपरिक म्युच्युअल फंड योजनांच्या पलीकडे जात नव्या आर्थिक पर्यायांची क्रेझ झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. ‘अम्फी’ने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स (SIF) च्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (AUM) जून २०२६ अखेर २९ टक्क्यांनी वाढून १७,८५८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मे महिन्यात हा आकडा १३,८१४ कोटी रुपये इतका होता.
नियामक संस्था ‘सेबी’ने फेब्रुवारी २०२५ मध्ये पारंपरिक म्युच्युअल फंड आणि बड्या गुंतवणुकीच्या ‘पीएमएस’ (PMS) मधील दरी सांधण्यासाठी या विशेष ‘SIF’ संरचनेची सुरुवात केली होती. डेरिव्हेटिव्ह्ज आणि फ्लेक्सिबल हेजिंगच्या माध्यमातून अधिक परतावा शोधणाऱ्या प्रगल्भ गुंतवणूकदारांचा या नव्या पर्यायाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जून महिन्यात या फंड्समधील मासिक आवक (Inflow) तब्बल ३,७८२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी मे महिन्यात फक्त १,३९६ कोटी रुपये होती.
‘व्हॅल्यूमेट्रिक्स फ्लो मीटर’च्या अहवालानुसार, SIF क्षेत्रात सध्या हायब्रीड (मिश्र) गुंतवणूक रणनीतीचे एकछत्री साम्राज्य पाहायला मिळत आहे. एकूण मालमत्तेपैकी ७२ टक्के हिस्सा (१२,८२२ कोटी रुपये) एकट्या हायब्रीड फंड्सच्या ताब्यात आहे. यामध्येही ‘हायब्रीड लाँग-शॉर्ट फंड्स’ सर्वाधिक लोकप्रिय ठरले असून, ते ११,९१० कोटी रुपयांचे व्यवस्थापन पाहत आहेत. दुसरीकडे, प्युअर इक्विटी (शेअर्स) आधारित SIF चा वाटा २८ टक्क्यांसह ५,०३६ कोटी रुपये इतका आहे. देशातील एकूण म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता जून महिन्यात तब्बल ८२.२ लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे.
हेही वाचा – अखेर CSK ने फोडला बॉम्ब, तो एक निर्णय घेतला अन् चाहत्यांना दिला सर्वात मोठा धक्का; आता पुढील हंगामात…
ॲक्टिव्ह इक्विटी फंड्समध्ये जून महिन्यात ६७,६०१ कोटी रुपयांची ढोबळ गुंतवणूक झाली, तर निव्वळ आवक (Net Inflow) २८,९७३ कोटी रुपये राहिली. मे महिन्यात ७२५ कोटींची गळती लागलेल्या गोल्ड ईटीएफमध्ये जून महिन्यात मोठी सुधारणा झाली असून, गुंतवणूकदारांनी यात ३,४४३ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली.
किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावरील भरवसा आजही कायम असल्याचे ‘एसआयपी’च्या विक्रमी आकड्यांवरून स्पष्ट होते. जून महिन्यात मासिक SIP गुंतवणुकीने ३१,७८१ कोटी रुपयांचा आजवरचा सर्वात मोठा उच्चांक गाठला आहे. यामुळे एकूण SIP मालमत्ता आता १७.७० लाख कोटींवर गेली असून, चालू एसआईपी खात्यांची संख्या १०.५२ कोटींवर पोहोचली आहे.
गुंतवणूकदार आता अधिक प्रगल्भ झाले आहेत. बाजारातील चढ-उतारांना घाबरून भावनिक निर्णय घेण्याऐवजी, ते दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी बाजारातील तेजीचा (Momentum) योग्य वापर करत आहेत. एसआयपीमधील हा सातत्यपूर्ण ओघ भारताच्या आर्थिक वृद्धीवरील विश्वासाचे प्रतीक आहे.





