ऐन दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा फटका; ग्राहकांच्या खिशाला कात्री

Electricity Price Hike : ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरवाढ केल्याने ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे. ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याचा परिणाम घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रावर होणार आहे.
१ जुलैपासून महावितरणने वीज दर कमी केल्याचा दावा करत नवीन दर लागू केले होते. मात्र, लगेचच ऑगस्टपासून इंधन समायोजन शुल्क लादण्यास सुरुवात झाली आणि आता सप्टेंबरसाठीही ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी महावितरणने एक सर्क्युलर जारी करून सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत. आता १ ते १०० युनिट वापरावर प्रति युनिट ३५ पैसे आणि ५०० युनिटपेक्षा अधिक वापरावर ९५ पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार आहे.
महावितरणच्या माहितीनुसार, वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागली. तसेच, अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला. या अतिरिक्त खर्चाची भरपाई आता इंधन समायोजन शुल्क लादून केली जात आहे.
हेही वाचा – ‘पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठीची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी मोजावे लागणार अधिक पैसे
याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनवरही इंधन समायोजन शुल्क लादण्यात आले आहे. त्यामुळे आता चार्जिंगसाठी प्रति युनिट ४५ पैसे अधिक द्यावे लागतील. शेतकऱ्यांनाही वीज दरात प्रति युनिट ४० पैसे अधिक द्यावे लागणार आहेत.
घरगुती ग्राहकांवरही याचा भार पडणार आहे. त्यानुसार, १ ते १०० युनिट – ३५ पैसे, १०१ ते ३०० युनिट – ६५ पैसे, ३०१ ते ५०० युनिट – ८५ पैसे, ५०१ पेक्षा जास्त – ९५ पैसे असे नवे दर असणार आहेत.
तर राज्य सरकारकडून औद्योगिक व व्यापारी वीज दरावर ९.९० पैसे प्रति युनिट एवढा कर लावला होता. आता एलटी औद्योगिक कनेक्शनसाठी प्रति युनिट ४० ते ५० पैसे आणि एचटी औद्योगिक कनेक्शनसाठी ५० पैसे प्रति युनिट एवढा इंधन समायोजन शुल्क लादण्यात आला आहे. त्यामुळे उद्योजक-व्यापाऱ्यांवर देखील याचा मोठा फटका बसणार आहे.





