दहशतवादामुळं उद्धस्त झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी ‘वेब पोर्टल’ सुरू

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादामुळं उद्धस्त झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी एक वेब पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या पोर्टलचं उद्घाटन केलं. या उपक्रमामुळे दहशतवादाने त्रस्त झालेल्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान होईल. या पोर्टलवर जिल्ह्यानुसार आकडेवारी नोंदवली जाईल, मदत प्रयत्नांचा मागोवा घेतला जाईल.
आर्थिक मदत, सानुग्रह अनुदान आणि अनुकंपापूर्ण रोजगार उपलब्ध करणं हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. पीडितांच्या मालमत्तेवरील अतिक्रमणांची देखील नोंद केली जाईल. निराकरण न झालेल्या किंवा प्रलंबित दाव्यांसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये मोफत हेल्पलाइनही सुरू करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – राज्यात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला ऑरेंज अलर्ट, कोकणात अतिवृष्टीची शक्यता
यावेळी, उपराज्यपालांनी १३ जुलै रोजी बारामुल्ला येथे दहशतवादामुळे प्रभावित झालेल्या ४० कुटुंबियांना नियुक्तीपत्रे दिली. त्यांनी सांगितले की, दहशतवादामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना नोकऱ्या आणि न्याय देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.
उपराज्यपाल ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आज जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादामुळे प्रभावित झालेल्यांच्या कुटुंबांसाठी एक समर्पित वेब पोर्टल सुरू करण्यात आले. या उपक्रमामुळे केंद्रशासित प्रदेशात दहशतवादामुळं उद्धस्त झालेल्या कुटुंबांना मदत, अनुकंपावर आधारित नियुक्ती आणि इतर प्रकारची मदत देण्याची प्रक्रिया सुलभ होईल.’





