ट्रम्पभेटीपूर्वीच जिनपिंग आणि किम जोंग यांची भेट
- ट्रम्प यांच्या भेटीपूर्वी झालेल्या अनपेक्षित भेटीमुळे तर्क सुरू
बिजींग – चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात आज अचानक भेट झाली. किम जोंग उन यांच्या आजच्या चीनभेटीबाबत प्रसिद्धी माध्यमांना आगोदर कोणतीच माहिती देण्यात आलेली नव्हती. किम जोंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आगामी काळात होणाऱ्या शिखर परिषदेपूर्वीच ही भेट झाली. त्यामुळे या भेटीबाबत तर्क व्यक्त होऊ लागले आहेत.
जिनपिंग आणि किम यांच्यातील चर्चेनंतर त्याबाबतचे वृत्त “सीसीटीव्ही’ या चीन सरकारच्या वृत्तवाहिनीवरून प्रसिद्ध करण्यात आले. त्यासंदर्भात आपण आपले मित्र शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जिनपिंग आणि किम हे दोघेजण दल्लान शहरात समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना या बातमीतल्या दृश्यांमध्ये दिसत आहे. या दोन्ही नेत्यांनी काल आणि आजही भेट झाल्याचे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
यावर्षी मार्च महिन्यापासून किम जोंग उन यांनी दुसऱ्यांदा चीनला भेट दिली आहे. शीतयुद्धकाळापासून चीन आणि उत्तर
कोरियाचे संबंध घनिष्ठ आहेत. मात्र संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियावर घातलेल्या निर्बंधांना चीनने पाठिंबा दिल्यावर हे संबंध ताणले गेले होते. आता ते पूर्ववत येत आहेत. किम यांने गेल्या महिन्यात दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांच्याबरोबर ऐतिहासिक परिषद घेतली आणि जून महिन्यात किम आणि ट्रम्प यांच्यातही बैठक होणे अपेक्षित आहे. आता उत्तर कोरियाबरोबरच्या परिषदेसंदर्भात मागे राहणे चीन टाळत आहे.