सुजय विखेंना राष्ट्रवादीकडून लढण्यास मी स्वतः सांगितले; अजित पवारांचा गैाप्यस्फोट
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला असून ते म्हणाले, मी स्वत: सुजय विखेंना राष्ट्रवादीकडून लढण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी यासाठी नकार दिला. हे जर खोटे असेल तर वाट्टेल ते करायला मी तयार असल्याचे पवार म्हणाले.
विरोधी पक्ष नेत्याचाच मुलगा भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसचे नाक कापले गेले जे मुलाला समजवू शकत नाहीत ते मतदारांना काय समजवणार, असा टोलाही अजित पवारांनी लगावला. तर राष्ट्रवादीने सामंजस्य दाखवलं असते तर ही परिस्थिती आली नसती, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले होते. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावरून सध्या राज्यात राजकारण बरेच तापले आहे.
राष्ट्रवादीच्या आडमुठी भूमिकेमुळेच काँग्रेस अडचणीत आली असे वातावरण निर्माण झाल्यामुळेच अजित पवारांनी हा गौप्यस्फोट केल्याचं बोलले जात आहे. दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले होते कि नगरच्या जागेवरून हा सर्व संघर्ष माझ्या मुलासाठी उभा राहिला, असे बोलणे मुळात चुकीचे आहे. कारण नगरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा सलग तीनवेळा पराभव झाला आहे. त्यामुळे नगरची जागा काँग्रेसला मिळाली असती तर आघाडीची एक जागा वाढेल, हे त्यामागील गणित होते, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.