शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ यांना पुणे म्हाडाचे संचालक पद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/IMG_20190313_174837.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ यांची पुणे म्हाडाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. राज्य महामंडळाच्या नियुक्त्यांमध्ये पिंपरी-चिंचवडला प्रतिसाद मिळाल्याने भाजप-शिवसेना युतीच्या शहर कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
शिवसेना आणि भाजप युती झाल्यानंतर आता राज्यातील विविध महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुणे म्हाडाच्या संचालकपदी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ यांची नियुक्ती झाली आहे. भुजबळ हे सध्या संत तुकाराम साखर कारखान्यावर संचालक पदावर कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते चेतन भुजबळ यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, पक्ष प्रवक्ते अमोल थोरात, उद्योजक मनिष कुलकर्णी, नवीन लायगुडे आदी उपस्थित होते.