उद्योगधंदे व व्यवसाय परवाना शुल्कवाढीचा प्रस्ताव विधीकडून दप्तरी दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/Madhuri.jpg)
पिंपरी ( महा ई न्युज ) – महापालिका हद्दीत असलेल्या उद्योगधंदे व व्यवसाय परवाना शुल्कात 30 टक्के वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव विधी समिती सभेत दफ्तरी दाखल करण्यात आला. हा प्रस्ताव महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात विविध व्यवसाय प्रकारचे व उद्योगधंदे असून, महापालिका प्रशासनाकडून त्यांचे तीन विभागांत वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये उद्योगधंदा परवाना कर्मचारी संख्येनुसार, व्यवसाय परवाना व्यवसायाच्या स्वरुपानुसार तर साठ्यानुसार साठा परवाना दिला जातो. या सर्व व्यवसायांना आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. याकरिता किमान 251 ते 27 हजार 951 रुपये वार्षिक शुल्क आकारले जाते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 386 चे तरतुदीस अधीन राहून दरवर्षी परवाना शुल्क निश्चित केले जाते. त्यानुसार आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनयम कलम 313 व 376 व उपविधीनुसार हा परवाना दिला जातो.
आतापर्यंत 1999-2000 नंतर 2010-11 सालाकरिता दहा टक्के शुल्कवाढ केली आहे. त्यानंतर 2012-13 या आर्थिक वर्षात 50 टक्के शुल्कवाढ लाग करण्यात आली होती. तर 2013-14 सालाकरिता 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. 2015-16 च्या शुल्कात 20 टक्के वाढ सुचवून विधी समितीमार्फत महापालिका सभेकडे ठेवण्यात आला होता. त्यावेळी 2015-16 साठी निश्चित केलेल शुल्क कायम केले आहेत. तर 2016-17साठी शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, 2019-10 या आर्थिक वर्षाकरिता सध्या प्रचलित असलेल्या दरात 30 टक्के दरवाढ सुचविण्यात आली होती . मात्र, हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला आहे.