आईला अश्लील मेसेज पाठविल्याचा जाब विचारल्याने मुलाला घरात घुसून केली मारहाण
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आईच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज पाठविल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करणा-या तरुणाने आपला विनयभंग केल्याची तक्रार मुलाच्या आईने पोलिसांत दिली आहे.
याप्रकरणी पंडित शिंदे, विनोद शिंदे यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि तिचा मुलगा आरोपींच्या शेजारी राहतात. महिलेचे पती लष्करात आहेत. घरात आई आणि १९ वर्षीय मुलगाच असतो. गेल्या आठवड्यात आरोपी पंडित शिंदे याला तुम्ही माझ्या आईच्या मोबाइलवर ‘आठवण येते का?’ असा मेसेज का टाकला, असा जाब विचारला. त्यावर आरोपी पंडित शिंदे, प्रमोद शिंदे आणि विनोद शिंदे यांनी महिलेच्या घरात घुसून मुलाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात मुलगा गंभीर जखमी झाला. मुलाच्या आईचा विनयभंगही केला. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत.